खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर येथील आंबेडकर भवन उभारणीसाठी परिशिष्ट जाती, जमातीच्या नागरिकांकडून गेली कित्येक वर्षे प्रयत्न सुरू आहेत. मात्र खानापूर तालुका अधिकाऱ्यांकडून गेल्या चार वर्षांत याची कोणतीच हालचाल झाली नाही, अशी तक्रार राजू खातेदार यांनी गुरूवारी दि. २२ रोजी रेल्वे स्टेशन रोड वरील समुदाय भवनात आयोजित परिशिष्ट जाती, जमातीच्या बैठकीत केली.
यावेळी बैठकीच्या अध्यक्षस्थानी नवनिर्वाचित आमदार विठ्ठलराव हलगेकर होते. तर व्यासपीठावर नगरसेवक लक्ष्मण मादार, तहसीलदार प्रकाश गायकवाड, तालुका पंचायत कार्यनिर्वाहक अधिकारी श्री. इरनगौड व पोलिस अधिकारी उपस्थित होते.
यावेळी समाज कल्याण खात्याचे अधिकारी श्री. बिराजदार यांनी प्रास्ताविक करून बैठकीचा उद्देश सांगितला.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व फोटो पुजन करण्यात आले. यावेळी बैठकीत मागासवर्गीयांसाठी आलेल्या निधीबद्दल अधिकाऱ्यांनी माहिती दिली.
यावेळी बोलताना नवनिर्वाचित आमदार विठ्ठलराव हलगेकर म्हणाले की, मी आमदार होऊन दीड महिना झाला. मागील चार वर्षांत खानापूरच्या आंबेडकर भवनाचे प्रकरण काय आहे याची माहिती मला मिळालेली नाही. गेल्या चार वर्षांपासुन आंबेडकर भवनासाठी काय अडचण आली. हे मी तुमच्या सोबत जिल्हा अधिकाऱ्यांशी भेटून चर्चा करू व लवकरात लवकर आंबेडकर भवन उभारणीसाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करू असे सांगितले.
यावेळी बैठकीत उपस्थित मान्यवरांनी तालुक्यातील गावच्या समस्या मांडल्या. त्यावर अधिकारी वर्गाने निरसन करून समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.
बैठकीला तालुका अधिकारी उपस्थित होते.
आभार गिरीश कुरहट्टी यांनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta