Saturday , July 27 2024
Breaking News

सीमाबांधवांचा कोल्हापुरात उद्या एल्गार!

Spread the love

कोल्हापूर : गेली 65 वर्षे कर्नाटक सरकारच्या अन्याय, अत्याचारांचा सामना करत लोकशाही मार्गाने सीमालढा तेवत ठेवणार्‍या सीमावासीयांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे. ’आता महाराष्ट्रात यायचचं’ या भावनेने पुन्हा एकदा सीमाबांधवांनी कोल्हापुरात रणशिंग फुंकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी आज शनिवार दि. 30 ऑक्टोबर रोजी ऐतिहासिक दसरा चौकात राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याच्या साक्षीने एक दिवसाचे धरणे सत्याग्रह आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनात सीमाभागातून मराठी बांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर कोल्हापूरमधील सर्व राजकीय पक्ष, नेते, पदाधिकारी, खासदार, आमदार, मंत्री यांच्यासह विविध संघटना, संस्था आणि त्यांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी या धरणे सत्याग्रहाला पाठबळ देवून सीमाबांधवांचा आवाज बुलंद करावा, असे आवाहन खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकार्‍यांनी केले आहे.
दरम्यान, कोल्हापुरातील या धरणे सत्याग्रहाच्या तयारीसाठी खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने सीमाभागात गेल्या आठवड्यापासून जनजागृती करण्यात येत आहे. समितीच्या पदाधिकार्‍यांनी गेल्या पंधरा दिवसांपासून कोल्हापूरमधील सर्व राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, मंत्री, खासदार, आमदार तसेच विविध संघटनांच्या भेटी घेऊन त्यांना सत्याग्रह आंदोलनाला पाठबळ देण्याचे आवाहन केले आहे.
दसरा चौकात धरणे सत्याग्रह
सीमाबांधवांचे धरणे सत्याग्रह आंदोलन ऐतिहासिक दसरा चौकात शनिवारी 30 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 4 यावेळेत होणार आहे. यासाठी भव्य मंडप उभारण्यात येणार आहे. तमाम करवीरवासीयांनीही या आंदोलनात सहभागी होऊन सीमावासीयांना पाठबळ द्यावे, असे आवाहन म. ए. समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
1956 च्या आंदोलनातील ज्येष्ठ सत्याग्रहींचा सहभाग
सीमालढ्याच्या 1956 च्या पहिल्या आंदोलनात सहभागी होऊन कारावास भोगून अनंत यातना सहन केलेले आणि सीमाप्रश्नाची सोडवणूक व्हावी, याकडे आस लागून राहिलेले ज्येष्ठ सत्याग्रही निडगलचे शंकरमामा पाटील, कसबा नंदगडचे पुंडलिकमामा चव्हाण, जळगे गावचे नारायणमामा लाड, कुप्पटगिरीचे नारायणराव पाटील, करंबळचे दे. भ. उर्फ देवाप्पा घाडी गुरूजी आदींसह अनेक ज्येष्ठ सत्याग्रही कोल्हापुरातील या धरणे सत्याग्रहात सहभागी होणार आहेत.
कोल्हापुरात स्थायिक झालेल्या सीमाबांधवांना आवाहन
नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात स्थायिक झालेल्या सीमाभागातील मराठी बांधवांनी शनिवारच्या या धरणे सत्याग्रह आंदोलनात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे कळकळीचे आवाहन म. ए. समितीने केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

तिरडीवरून नेलेल्या आमगावच्या “त्या” दुर्दैवी महिलेचा अखेर मृत्यू

Spread the love  खानापूर : खानापूर तालुक्यातील एका टोकास वसलेल्या दुर्गम भागातील आमगाव येथील महिलेला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *