
खानापूर : रामनगर येथील श्री दत्त मंदिर ट्रस्ट कमिटीचे श्री दत्त मंदिर या ठिकाणी सुरू असलेल्या श्री दत्त बाल संस्कार केंद्रात गुरुपौर्णिमेनिमित्त अर्थात श्री महर्षी वेदव्यास जयंती मोठ्या भक्ती भावाने साजरी करण्यात आली. प्रारंभी मंदिराचे पुजारी श्री मोहन आंबेकर यांनी श्री दत्तात्रेयाला अभिषेक घातला. तद्नंतर संस्कार केंद्रातील सर्व विद्यार्थ्यांनी श्रीदत्त प्रतिमेला अभिषेक केला. मान्यवरांच्या हस्ते महर्षी वेदव्यास यांच्या फोटोप्रतिमेचे पूजन करण्यात आले. वैश्य बांधव भगिनींनी वैश समाजाचे विश्वगुरू श्री श्री वामन आश्रम स्वामी यांच्या प्रतिमेचे भक्तिभावाने पूजन केले. श्री दत्त बाल संस्कार केंद्राच्या आयोजकानी श्री आंबेकर भटजींची पाद्यपूजा करून या कार्यक्रमाला चालना दिली. त्यानंतर पूजेनीय व वंदनीय असे व्यक्तिमत्व म्हणजे माजी मुख्याध्यापिका श्रीमती नलिनी हेगडे यांची पाद्यपुजा संस्कार केंद्रातील सर्व विद्यार्थ्यांनी केली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते संस्कार केंद्रातील सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, आई हे पहिले आणि परम दैवत असून तो आपला पहिला गुरु आहे. आई आपल्या मुलाबाळांच्या व्यक्तिमत्वाला सुंदर रूप देते आकार देते प्रसंगी स्वतःला विसरते. मुलाना संस्कारक्षम बनविते. अशा संस्कार केंद्रातून विद्यार्थ्यांना आपली जन्मभूमी आपली संस्कृती धर्म देव शिस्त भक्ती रिती रीवात परंपराचे ज्ञान मिळते. ज्या ज्या ठिकाणी मंदिर आहे तिथे तिथे जर संस्कार वर्ग चालेल तर आमच्या देशात सोन्याचा पाऊस पडेल शिवाय मतभेद मिटतील गुरु शिष्य परंपरा पुन्हा सुरू होईल एकूण रामराज्य होईल असे विचार त्यानी व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर श्रीनारायण शेटकर, श्री गोविंद मालशेट, श्री गुरुदास शेटकर, श्री मारुती मापारी, श्रीपाद खापणे, तसेच विद्यार्थ्यांचे पालक वर्ग आणि वैश बांधव भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सानिका लोहार व आणि सहकारी यांच्यावतीने प्रार्थना सादर करण्यात आली. आयोजकांनी उपस्थितांचे स्वागत केले शेवटी आरती, विश्वप्रार्थना व तीर्थप्रसादाने कार्यक्रमाचे सांगता झाली.
Belgaum Varta Belgaum Varta