
खानापूर : खानापूर तालुक्यातील मान जवळील शिंबोली धबधब्याच्या ठिकाणी आनंद लुटण्यासाठी गेलेल्या एका युवकाचा धबधब्यात पडून मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी एकच्या सुमारास घडली आहे. तर अन्य एक जण थोडक्यात बचावला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, पिरनवाडी व हुंचेनहट्टी येथील काही युवक चोर्लां जवळील मान येथील शिंबोली या धबधब्याच्या ठिकाणी आनंद लुटायला गेले होते. त्यांच्या समवेत आणखी चार पाच मित्र होते. धबधब्यात वरून पडणाऱ्या पाण्याचा आनंद लुटण्यासाठी पाण्याचा प्रवाहाखाली ते दोघे गेले असता एक जण तोल जाऊन खाली पडला. व तो 15 ते 20 मिनिटे बाहेर आला नाही. तर अन्य एकदा धबधब्याखाली तोल जाऊन पडला तो लागलीच बाहेर आल्याने तो थोडक्यात बचावला. या घटनेत मृत्यू झालेल्या युवकाचे नाव हयाज पठाण (वय 19) रा. हुंचेनहट्टी असे असून बचावलेल्या युवकाचे नाव मंजुनाथ लमानी, पिरनवाडी असे आहे. घटनास्थळी पर्यटकांची गर्दी होती घटना कळताच लागलीच त्या ठिकाणी त्या धबधब्याच्या डोहात पडलेल्या युवकाचा शोध घेण्यात आला. तासभरात त्याचा मृतदेह मिळाला, घटनास्थळी जांबोटी आऊट पोस्टचे सहाय्यक पोलीस अधिकारी बडगेर तसेच सलाम यांनी जाऊन पंचनामा केला आहे. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. सदर घटनेची नोंद खानापूर पोलीस स्थानकात झाली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta