
खानापूर : पावसाने सध्या सर्वत्र थैमान मांडले आहे. नदी नाले ओसंडून वाहत आहेत. शेतीच्या कामाला देखील वेग आलेला आहे. मलप्रभा नदी काठावरील शेतात चरण्यासाठी सोडलेला बैल पाय घसरून नदीपात्रात पडला. मात्र या बैलाने मोठ्या धाडसाने दुथडी भरून वाहणाऱ्या नदीपात्रातून जवळपास दहा किलोमीटर अंतर पोहत जाऊन स्वतःचा जीव वाचण्याची घटना आज कुसमळीजवळ घडलेली आहे. या घटनेत बैल बचावला आहे मात्र त्याची प्रकृती अत्यवस्थ असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
याबाबतची अधिक माहिती अशी की, हब्बनहट्टी संतोष गणपती घाडी हे कुसमळी येथील आपल्या शेतात भात लागवडीचे काम करीत होते त्यांनी आपल्या बैल जोडीला चरण्यासाठी नदीकाठावर सोडले होते. त्यावेळी काठाचा अंदाज न आल्यामुळे बैलाचा पाय घसरला आणि बैल थेट पाण्यात पडला व पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने तो वाहून जाऊ लागला. ही बाब संतोष यांच्या लक्षात येताच त्यांनी त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पण पाण्याचा वेग इतका होता की त्यांना बैलाला नदीपात्रा बाहेर काढणे शक्य झाले नाही. मात्र बैलाने अत्यंत हुशारीने शंकरपेठ पर्यंतचे जवळपास दहा किलोमीटर अंतर पोहत जाऊन आपला जीव वाचविला व एका झुडपाच्या आधाराने बैल नदीपात्रात तसाच अडकून राहिला. शेतकरी आपल्या बैलाचा शोध घेत असताना नदीपात्रात अडकलेला बैल त्यांच्या निदर्शनास आला व त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. बैलाला पाण्यातून बाहेर काढण्यात आले पण त्याच्या पोटात पाणी गेल्यामुळे तो बैल अत्यवस्थ झाला होता. लागलीच घाडी यांनी पशुवैद्यकांना बोलवून उपचार सुरू केला. अद्याप त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली नसल्याचे समजते. दुथडी भरून वाहणाऱ्या नदीतून दहा किलोमीटर पोहत जाणाऱ्या बैलाचे खानापूर परिसरात कौतुक होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta