खानापूर : राज्यात काँग्रेसचे सरकार येताच पाच हमी योजनाचा शुभारंभ करण्याचे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी दिले होते. त्यांनी आपल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी बुधवारी दि. ३० रोजी गृहलक्ष्मी योजनेचा शुभारंभ राज्यातील प्रत्येक ग्राम पंचायत, नगरपंचाय आदी कार्यालयात आयोजित करण्यात आला.
यानिमित्ताने खानापूर शहरातील नगरपंचायतीच्यावतीने रेल्वे स्टेशन रोडवरील समुदाय भवनात गृहलक्ष्मी योजनेचा शुभारंभ आमदार विठ्ठलराव हलगेकर यांच्याहस्ते करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर तहसीलदार प्रकाश गायकवाड, तालुका पंचायत कार्यनिर्वाह अधिकारी इरनगौडर, सी डी पी ओ चंद्रशेखर सुखसागर, चिफ ऑफिसर आर के वडार, सीपीआय महांतेश नाईक, नगरपंचायतीचे नगरसेवक व तालुका अधिकारी उपस्थित होते.
यावेळी नगरपंचायतीच्या शोभा पत्तार यांनी प्रास्ताविक केले. तर उपस्थितांचे स्वागत राजश्री वर्णेकर यांनी केले.
यावेळी आमदार विठ्ठलराव हलगेकर व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोपाला पाणी देऊन योजनेचा शुभारंभ केला.
यावेळी बोलताना आमदार विठ्ठलराव हलगेकर म्हणाले की, राज्यात काँग्रेसचे सरकार आले आणि पाच हमी योजनेचा लाभ राज्यातील जनतेला झाला. या गृहलक्ष्मी योजनेमुळे महिलांना २००० रूपये खात्यावर जमा होणार आहे. याचा मला भाजपचा आमदार असलो तरी आनंद आहे. राज्यातील महिलांनी याचा लाभ करून आपल्या संसारासाठी आर्थिक मदत करून घ्यावी व अडचणीच्यावेळी ही २००० रूपये रक्कम उपयोगात करून घ्यावी. ही योजना दीर्घकाळ टिकून राज्यातील महिलाना याचा लाभ मिळू दे, असे मत व्यक्त केले.
या शुभारंभानिमित्त रांगोळी स्पर्धेतील विजेत्या महिलाना बक्षिसे देऊन गौरव करण्यात आला.
या गृहलक्ष्मी योजनेच्या शुभारंभ कार्यक्रमाला महिलानी प्रचंड गर्दी केली होती.