सी ओ. ची हकालपट्टी हाच निर्णय ऍड. ईश्वर घाडी
खानापूर : खानापूर नगरपंचायतींचे चीफ ऑफिसर आर. के. वटारे यांच्या मनमानी कारभाराला स्वच्छता कामगार, नगरपंचायतींचे कर्मचारीवर्ग कंटाळले. त्यामुळेच स्वच्छता कामगार युनियनने शुक्रवारी सकाळपासून नगरपंचायतींच्या कार्यालयाला टाळे टोकून आंदोलन छेडले. त्या आंदोलनाला खानापूर तालुका वकील संघटनेचा पाठिंबा व्यक्त करत नगरपंचायतींचे चीफ ऑफिसर आर. के. वटारे मनमानी कारभार करत असतील तर त्यांची हकालपट्टी हा एकच पर्याय. त्याशिवाय नगरपंचायतींचे कामकाज सुरळीत होणार नाही. नगरपंचायतीच्या स्वच्छता कामगार आंदोलनाला वकील संघटनेचा नेहमीच पाठींबा आहे, अशी प्रतिक्रिया खानापूर वकील संघटनेचे अध्यक्ष ऍड. ईश्वर घाडी यांनी शुक्रवारी नगरपंचायतीच्या स्वच्छता कामगार संघटनेच्या आंदोलनाला भेट देऊन व्यक्त केली.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, खानापूर शहर हे स्वच्छता कामगारांच्या कामामुळे स्वच्छ आहे. पहाटे पाच वाजता शहराच्या स्वच्छतेसाठी हे कामगार पाऊस, वारा, थंडी याची तमा न बाळगता कामाला लागतात. ही कौतुकाची गोष्ट आहे. असे असताना चीफ ऑफिसर आर. के. वटारे हे या कामगाराना चांगली वागणूक देत नाही. स्वतः ऑफिसमध्ये बसुन काम करतात. त्यांना एसी ची गरज आहे. मात्र स्वच्छता कामगारांचे तीन, तीन महिन्याचे पगार दिले नाहीत. त्याना पीएफ सुरू केले नाहीत. ही निंदनीय गोष्ट आहे. तेव्हा स्वच्छता कामगाराना न्याय दिलाच पाहिजे अशी भूमिका घेतली.
यावेळी ऍड. अनंत देसाई, सामाजिक कार्यकर्ते दिलीप पवार, श्री. सुळकर, आदीनी पाठिंबा जाहीर केला. नगरपंचायतींच्या स्वच्छता कामगारांचे आदोलन दुपारपर्यंत सुरुच होते.