
खानापूर : जांबोटी- कणकुंबी- चोर्ला रस्ता तात्काळ दुरुस्त करण्यात यावा यासाठी आज सकाळपासून कणकुंबी येथे नागरिकांनी रस्ता रोको करून आंदोलन केले. जांबोटी- कणकुंबी- चोर्ला रस्त्याची खड्डे पडून दुरावस्था झाली होती.
कणकुंबी, परवाड, आमटे, जांबोटी परिसरातील ग्राम पंचायत सदस्य, आजी माजी लोकप्रतिनिधी तसेच ग्रामस्थांनी सोमवारी सकाळी कणकुंबी येथे रास्ता रोको करत आंदोलन छेडले. त्यामुळे दोन्ही बाजूने गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी खानापूरचे तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेतले व त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी येत्या दोन-तीन दिवसात जर रस्ता दुरुस्त करण्यास सुरुवात झाली नाही तर या ठिकाणी पुन्हा रस्ता रोको करून उग्र आंदोलन हाती घेण्यात येईल, असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला.
यावेळी खानापूर तहसीलदार तसेच संबंधित खात्याचे अधिकारी आणि रस्त्याचे कॉन्ट्रॅक्टर यांनी येत्या तीन दिवसात रस्ता दुरुस्तीला सुरुवात करण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलकांनी आपले आंदोलन मागे घेतले.
Belgaum Varta Belgaum Varta