Monday , December 23 2024
Breaking News

यंदाचा जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार कापोली हायस्कूलचे मुख्याध्यापक सुरेश घुग्रेटकर यांना जाहीर

Spread the love

 

खानापूर : खानापूर तालुक्यातील मराठा मंडळाचे ‘कापोली हायस्कूल कापोलीचे मुख्याध्यापक सुरेश घुग्रेटकर यांना शिक्षण खात्याकडून दिला जाणारा बेळगांव जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. एका जातीवंत, हाडांच्या, गणित कलावंताला हा पुरस्कार जाहीर झाल्याने योग्य, अभ्यासू व्यक्तिला पुरस्कार दिल्याचे समाधान शिक्षकवर्गाला वाटते आहे. सुरेश घुग्रेटकराना हा पुरस्कार देण्यात आल्याने या पुरस्काराचेही महत्व वाढले आहे असे म्हटल्यास काही वावगे ठरणार नाही कारण एका योग्य, अष्टपैलू शिक्षकाला हा पुरस्कार देण्यात आला आहे.

सरांचा जन्म बेळगांव तालुक्यातील ‘अलतगे’ येथिल एका सामान्य कुटुंबात १९६४ला झाला. लहानपणापासूनच एक हुशार विद्यार्थी म्हणून शाळेत गणला जायचा, एकत्र कुटुंबात वाढल्याने माणसं जोडायची कसब यांच्यात लहानपणापासूनच आहे.
सरांची शिक्षकी सेवेची सुरवात १९८७ ला मराठा मंडळाच्या कापोली हायस्कूल कापोलीमधून झाली. त्यानंतर १९९६ ते २०१५ पर्यंत बेकवाड हायस्कूलमध्ये सहशिक्षक म्हणून सेवा केली. तर २०१६ मध्ये मंडळाने कापोली माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक म्हणून त्यांना बढती दिली. गणित हा आवडता विषय व मजबूत पकड असल्याने गणिताचा कलावंत म्हणून त्यांची गणना तालुक्यातून होते. गेल्या ७ वर्षापासून ते कापोली हायस्कूलचे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. कापोलीसारख्या दुर्गम भागात नोकरी करता करता माजी विद्यार्थांच्या सहकार्याने व दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने संपूर्ण शाळेचा डिजिटल कायापालट केला आहे. सरांचे विद्यार्थी देशात-परदेशात वेगवेगळ्या क्षेत्रात उच्चपदावर कार्यरत आहेत, गेल्या चांद्रयान ३ मोहिमेत ISRO चे वैज्ञानिक म्हणून सरांच्या विद्यार्थांनी मोलाचं कार्य केले आहे. सरांच्या एका हाकेला अनेक विद्यार्थी शाळेच्या मदतीला धावून येतात. कापोली सारख्या दुर्गम खेड्यातली शाळा सुद्धा आज बघण्यासारखी आहे. यामध्ये मराठा मंडळाच्या अध्यक्षा सौ. राजश्री नागराजू (हलगेकर), संचालक मंडळ, सहशिक्षक -शिक्षिका, दानशूर व्यक्ती व माजी विद्यार्थांच्या सहकार्याने हे सर्व साध्य करता आले. मराठा मंडळाच्या अध्यक्षा सौ. राजश्री नागराजू (हलगेकर) आणि संचालक मंडळाचे सरांना खूप मोलाचे पाठबळ आणि मार्गदर्शन मिळाले आहे. दरवर्षी इ.१० वीचा निकाल उत्तम असल्याने होतकरू, जातीवंत हाडांचा शिक्षक म्हणून सरांचा गौरव मराठा मंडळांत आहे. या पुरस्काराने मंडळाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

शिक्षणप्रेमी, विद्यार्थीप्रिय, क्रियाशिल शिक्षक म्हणुन सर चिरपरिचित आहेत. शिक्षण खात्याने शाळेला सन २०१८ मध्ये खानापूर तालुका आदर्श शाळा पुरस्कार देऊन शाळेला गौरविले आहे.
आजूबाजूच्या खेड्यापाड्यातील गरीब- होतकरू विद्यार्थ्यांना त्यांच्या घरापर्यंत जावून शिक्षणाचे महत्त्व, पर्याय आणि मार्गदर्शन‌ करून अनेक विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवणारे शिक्षक म्हणून ओळख. त्यांच्या हातून आज अनेक विद्यार्थी उच्चपदस्त, वैज्ञानिक, डॉक्टर, इंजिनिअर, शिक्षक, उद्योजक म्हणून कार्यरत आहेत. सरांना दोन अपत्ये मोठा डाॅ. बाळकृष्ण हा एम.बी.बी.एस. तर धाकटा डॉ. पंकज हा बी.डी.एस. आहे, सरांनी इतर विद्यार्थ्यांना विद्यार्जन करत करत स्वतःच्या मुलांनाही उच्च विद्याविभूषित करून एक वेगळा आदर्श घडवला आहे.
संस्थेच्या अध्यक्षा व संचालक मंडळ, शिक्षकवृंद व‌ कर्मचारी यांच्याशी अगदी आदबिने, आदराने वागणारी व्यक्ती म्हणून लौकिक. शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी गेली आठ वर्षे अविरत प्रयत्न, प्रत्येक कार्यात उत्कृष्ट सहभाग, शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक कार्यात मोलाचे सहकार्य तसेच गणित विषयावर उत्तम प्रभुत्व त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या भवितव्याचे गणित घडविण्यात सरांचा सिंहांचा वाटा आहे.
सरांच्या चौफेर कार्याचा आढावा घेऊन शिक्षण खात्याच्यावतीने २०२३ चा जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी त्यांची निवड केल्याने एका योग्य शिक्षकाचा गौरव करण्यात आल्याचे समाधान शिक्षकवर्ग, विद्यार्थीवर्ग आणि शिक्षणप्रेमींच्याकडून व्यक्त करण्यात येत आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव येथे होणाऱ्या काँग्रेस अधिवेशनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहणार!

Spread the love  खानापूर तालुका काँग्रेस पक्षाच्या बैठकीत निर्णय खानापूर : बेळगाव येथे येत्या 26 …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *