पंचक्रोशीतील नागरिकांतर्फे आमदारांना निवेदन
खानापूर : चापगाव ग्राम पंचायत क्षेत्रातील जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आमदार विठ्ठल हलगेकर यांना पंचक्रोशीतील जनतेच्यावतीने चापगाव येथील दहीकाला कार्यक्रमावेळी निवेदन देण्यात आले. यावेळी आमदार विठ्ठल हलगेकर, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, पंचमंडळी, ग्रामस्थ आणि पंचायत सदस्य उपस्थित होते.
यावर्षी पावसाने पाठ फिरविल्याने भात पिकासह इतर पिके वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे दुष्काळसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या असलेले पीक वाचवण्यासाठी शेतकरी पाण्यासाठी विजेवर अवलंबून आहेत. मात्र चापगाव परिसरात सुरळीत वीजपुरवठा नसल्याने शिल्लक असलेली पिके सुकून जाण्याच्या मार्गावर आहेत. यासाठी या भागातील वीजपुरवठा सुरळीत करण्यात यावा. चापगाव पंचायत क्षेत्रात पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. यासाठी आमदार निधीतून कूपनलिका मंजूर करण्यात याव्यात. तसेच चापगाव येथील लक्ष्मी मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा संकल्प केला असल्याने यासाठी धर्मादाय खात्याकडून मंदिर बांधकामासाठी मोठा निधी उपलब्ध करून देण्यात यावा,
तसेच शासनाकडून मिळणाऱ्या वृद्धापवेतन, संध्या सुरक्षा यासह इतर योजनेपासून चापगाव पंचायत क्षेत्रातील ८० टक्के लोक अद्याप वंचित आहेत. यासाठी चापगाव येथे जनस्पंदन कार्यक्रम राबवुन लाभार्थ्यांच्या समस्या सोडविण्यात याव्यात. दारिद्र्यरेषेखालील कुटुंबे बीपीएल रेशन कार्डापासून वंचित आहेत. त्यांना बीपीएल
रेशनकार्ड मिळवून देण्यासाठी अन्न नागरीपुरवठा खात्याची बैठक आयोजित करून समस्या मार्गी लावाव्यात, तसेच यडोगा व वड्डेबैल येथील बंधाऱ्यात पाणी अडवण्याची सूचना करावी, या मागण्यांचे निवेदन आमदार विठ्ठल हलगेकर यांना देण्यात आले.
समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदारांचे आश्वासन
यावेळी आमदारांनी निवेदनाचा स्वीकार करून चापगाव परिसरातील समस्या सोडवण्यासाठी संबंधित खात्याला योग्य सूचना देण्यात येतील, आणि समस्या मार्गी लावण्यासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करू, असे आश्वासन दिले.
यावेळी डॉ. रोशन पाटील, रमेश धबाले, उदय पाटील, अशोक बेळगावकर, पांडुरंग पाटील, नजीर सनदी, लक्ष्मण पाटील यासह इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.