खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेसच्या वतीने नगरपंचायतीचे मुख्याधिकारी संतोष कुरबेट यांना निवेदन
खानापूर : येथील नगरपंचायतीच्या सफाई कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन येत्या 24 तासात करण्यात यावे, अशी मागणी करत खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेसच्या वतीने नगरपंचायतीचे मुख्याधिकारी संतोष कुरबेट यांना निवेदन देण्यात आले. यावेळी ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष महादेव कोळी यांनी सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन कोणत्याही परिस्थितीत 24 तासात करण्याची मागणी केली. गेल्या आठ महिन्यापासून सफाई कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधीची रक्कम भरण्यात आलेली नाही. त्यामुळे कामगारांचे भवितव्य धोक्यात आले आहे. यासाठी कोणत्याही परिस्थितीत त्यांचा आठ महिन्यापासून न भरलेला भविष्य निर्वाह निधी सरकारला जमा करावा, असे ते म्हणाले.
यावेळी नगरसेवक तोविद चांदक्कणावर यांनीही कोणत्याही परिस्थितीत वेतन आणि भविष्य निर्वाह निधी जमा करावा, अशी मागणी केली. तसेच कार्यालयात वेळेवर हजर राहण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना वेळेचे बंधन घालावे, अशी मागणी केली. नगरसेवक लक्ष्मण मादार यांनी, थकीत कर्मचाऱ्यांच्या वेतनावरून जाणीवपूर्वक राजकारण करण्यात येत आहे. यापूर्वी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी वेळोवेळी आम्ही आर्थिक नियोजन करून वेतन दिले होते.यापूर्वी वेतन थकण्याचे प्रकार अनेकवेळा झाले होते.मात्र मी स्वत: जबाबदारी स्वीकारत वेतन करण्यासाठी पुढाकार घेतला होता. यावेळी कर्मचारी आणि मुख्याधिकारी यांच्यातील वादावादीचे राजकारण करून नगरपंचायतीत जाणीवपूर्वक राजकारण आणून वाद निर्माण केला आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन हे नगरपंचायतीकडून करण्यात येते. त्यासाठी करवसुली होणे आवश्यक आहे. घरपट्टी एक कोटी 78 लाख, पाणीपट्टी एक कोटी 25 लाख, नगरपंचायतीचे दुकानगाळ्यांचे भाडे 78 लाख, परवाना फी 17 लाख असे एकूण चार कोटीच्या आसपास कर थकलेला आहे. शहरातील मालमत्ताधारकानी थकीत कर भरून सहकार्य करावे, असे आवाहन केले. यावेळी मुख्याधिकारी संतोष कुरबेट म्हणाले, उद्या दुपारपर्यंत कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी जमा करण्यासाठी नियोजन सुरू असून थकीत एक महिन्याचा पगार प्रथम देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
यावेळी महादेव कोळी, सुरेश जाधव, नगरसेवक लक्ष्मण मादार, तोहीद चंदावरकर, शायरा सनदी, फातीमा बेपारी तसेच सावित्री मादार, गुड्डू टेकडी, दिपक कवठनकर, राम हट्टीकर, भूषण पाटील, साईश सुतार, इसाक पठान, अभिषेक शहापूरकर, सत्यवा कांबळे, पांडू पाटील, भरतेश तोरोजी, मल्लेशी पोळ, आकाश बेळगावंकर यासह काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.