खानापूर : खानापूर तालुका शेतकरी संघटना व बेळगाव-गोवा महामार्गात जमीन गेलेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या वतीने गुरुवारी (ता. ५) सकाळी ११ वाजता गणेबैल येथील टोलनाक्यावर टोल बंद आणि रास्ता रोको करण्यात येणार आहे. शेतकरी संघटनेने यापूर्वीच याबाबत इशारा दिला आहे.
बेळगाव – गोवा महामार्गासाठी जमीन गेलेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात आली नसून, याबाबत खानापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी वेळोवेळी आवाज उठविला होता. मात्र, सरकारकडून शेतकऱ्यांची नुकसानभरपाई देण्यासंदर्भात योग्य हालचाली झाल्या नाहीत. जुलैमध्ये गणेबैल येथे टोलनाका सुरू करून रस्त्याचे काम पूर्ण होण्यापूर्वीच टोलनाका सुरू करण्यात आला होता. या विरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी खानापूर येथे बैठक घेऊन शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईचे दावे आठ दिवसात निकालात काढण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या कोणत्याच मागण्या मान्य झाल्या नसून नुकसानभरपाई अद्याप मिळालेली नाही. यासाठी पंधरा दिवसांपूर्वी शेतकरी संघटनेने आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी पाच पाच ऑक्टोबरपर्यंत नुकसानभरपाई देण्यात यावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र, सरकारने आणि महामार्ग प्राधिकरणाने याबाबत गांभीर्याने घेतले नसल्याने शेतकऱ्यांनी आंदोलनाचा निर्णय घेतलेला आहे.