खानापूर : एका मोठ्या कारवाईत कुख्यात वाघिणीची शिकार करणाऱ्या चिका उर्फ कृष्णा पाटेपवार याला बेळगाव वनविभागाच्या वन अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. या वर्षी जुलै महिन्यात बेळगाव विभागातील खानापुर तालुक्यातील स्थानिक जळगा झोनमध्ये चंदनाची झाडे चोरीला गेली होती. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत, खानापुर उपविभागाच्या वन अधिकाऱ्यांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी सापळा रचला होता. काही दिवसांपूर्वी बेळगाव शहराजवळील कणबर्गी जवळील कलखांब गावाजवळ आरोपी लपून बसला असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली त्या माहितीच्या आधारे, खानापुर झोनचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने एका मंडपावर छापा टाकून मंडपातून चंदनाचे तुकडे व धारदार शस्त्रे जप्त केली. आणि एकाला अटक करण्यात आली.
खानापूर उपविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक डॉ. संतोष चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ताब्यात घेतलेला हा आरोपी मध्य प्रदेशातील असल्याचा संशय व्यक्त करून, त्याची सखोल चौकशी केली. या अटकेतील व्यक्तीचे नाव मध्य प्रदेशातील दामो जिल्ह्यातील सगोनी गावातील चिका उर्फ कृष्णा पाटेपवार असे आहे आणि तो देशातील एक कुख्यात वाघ शिकारी आहे. या आरोपीने यापूर्वीही महाराष्ट्र राज्यातील अमरावती जिल्ह्यातील मेळघाट जंगलात वाघ आणि अस्वलांची शिकार केली असून, काही वर्षांपूर्वी मृत्यू झालेला कुख्यात वाघ शिकारी संसा चंद याच्या टोळीचा सदस्य असल्याची माहिती आहे.
ही कारवाई केल्याबद्दल बेळगाव परिमंडळाचे मुख्य वनसंरक्षक मंजुनाथ चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली बेळगाव विभागाचे उपवनसंरक्षक शंकर कल्लोळकर, खानापूर उपविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक संतोष चव्हाण, नागराज बलेहोसूर विभागीय वनसंरक्षक खानापूर, प्रादेशिक वनपरिक्षेत्राचे अधिकारी व कर्मचारी, तसेच विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे कौतुक होत आहे.