Tuesday , September 17 2024
Breaking News

खानापुरात पत्रकाराला मारहाण; संबंधितांवर कारवाई करावी

Spread the love

 

दोषीवर कारवाई करा; पत्रकार संघटनेचे पोलिसात निवेदन

खानापूर : खानापूर शहरात श्री दुर्गादेवीची विसर्जन मिरवणूक सुरू असताना ‘आपलं खानापूर’चे संपादक दिनकर मरगाळे यांना दोघांनी अचानकपणे मुष्टीने मारहाण केल्याने ते जखमी झाल्याची घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी खानापूर पोलीस स्थानकात संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून पत्रकाराला मारहाण करणाऱ्या त्या दोषीवर कारवाई करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन खानापूर तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने खानापूर पोलीस निरीक्षक मंजुनाथ नाईक यांच्याकडे केले आहे. खानापूर तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष पिराजी कुऱ्हाडे पत्रकार संघटनेचे कार्याध्यक्ष वासुदेव चौगुले (पुढारी) संघटनेचे सेक्रेटरी प्रसन्ना कुलकर्णी (विजय कर्नाटक ) सभासद विवेक गिरी (तरुण भारत), सुहास पाटील (उदय वार्ता), हनुमंत गुरव, (सकाळ) शंकर देसुरकर, (पुढारी) संदीप सुतार (सकाळ) आदी उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, “आपलं खानापूर”चे संपादक दिनकर मरगाळे हे मंगळवारी रात्री श्री दुर्गादेवी विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते. विसर्जन मिरवणूकला वेळ होत असल्याने पोलिसांनी वेळेत विसर्जन करण्याची सूचना केल्याने मूर्ती विसर्जनासाठी मलप्रभा घाटावर घेऊन जात असताना काही लोकांनी मिरवणूक अडवून नाचण्यास प्रारंभ केला. दरम्यान दिनकर मरगाळे यांनी पोलिसांच्या सूचनेनुसार आपण लवकर विसर्जन करत आहोत अडवू नका अशी त्या युवकांना केली विनंती केली. पण त्या युवकांनी आपला आडमुठेपणा कायम ठेवून नाचण्यास प्रारंभ केला. दरम्यान दिनकर मरगाळे यांना प्रतिकार करून त्यांच्या डोळ्यावर मूष्टीने मारले, त्यामुळे ते जागीच बेशुद्ध पडले अशा परिस्थितीतही त्या दोन युवकांनी लाथांनी त्यांच्या कमरेत जोरात मार दिली त्यामुळे त्यांना जबर दुखापत झाली आहे. दिनकर मरगाळे यांच्या डोळ्याला मोठी दुखापत झाली आहे. त्यांनी खानापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून घेतला आहे.

दिनकर मरगाळे यांनी भय्या (अंगद) पिराजी कुंभार व बन्सी दत्ता कुंभार यांच्यावर एफआयआर नोंद केली असून या प्रकरणाची पोलिसांनी कसुन चौकशी करावी व दोषीवर कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा खानापूर तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने या निवेदनाद्वारे केला आहे.

About Belgaum Varta

Check Also

लोकोळी येथील लक्ष्मी मंदिरात चोरी!

Spread the loveखानापूर : खानापूर तालुक्यातील लोकोळी येथील लक्ष्मी मंदिरात काल रात्री चोरी झाली असून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *