खानापूर : खानापूर येथील कॅनरा बँकेच्या शाखेला अचानक आग लागली आहे. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे. बँकेचे महत्त्वाचे कागदपत्रे कम्प्युटर व फर्निचर इत्यादी वस्तू आगीच्या भक्षस्थानी पडल्या आहेत. सुदैवाने पैसे ठेवलेल्या स्ट्रॉंग रूम पर्यंत आग पोहोचू शकली नाही. अग्निशामक दल या ठिकाणी दाखल झाले असून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करीत आहेत.
सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. ही आग रात्री उशिरा लागल्याची शक्यता आहे. पहाटे फिरायला जाणाऱ्या नागरिकांच्या लक्षात येताच तात्काळ अग्निशामक दलाला व पोलिसांना ही माहिती दिली. माहिती मिळताच अग्निशामक दलाचे कर्मचारी व पोलीस खात्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू केले. बँकेच्या इमारतीत आगीमुळे प्रचंड धूर कोंडल्यामुळे अग्निशामक दलाचे कर्मचारी ऑक्सिजन मास्क लावून आग विझविण्याचा प्रयत्न करीत आहेत. घटनेची माहिती मिळताच खानापूर पोलीस स्थानकाचे पीएसआय गिरीश एम. पोलीस कर्मचारी जयराम हमन्नावर, बसवराज तेगूर यांच्या सहकार्याने अग्निशामक दलाचे खानापूर ठाणे अधिकारी श्री. मनोहर राठोड व त्यांचे सहकारी आग विझविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत संपूर्ण आग विझविल्यानंतरच नेमकी किती हानी झाली आहे हे समजणार आहे.