खानापूर : खानापूर तालुक्यातील सन्नहोसूर गावात दोन घरात, भरदिवसा चोरी झाली असून चोरट्यांनी एका घरातून 10 तोळे सोने व 25 तोळे चांदी तर दुसऱ्या एका घरातून 5 तोळे सोने व 10 तोळे चांदीचे दागिने लंपास केले असल्याची घटना काल सायंकाळी सहा वाजता उघडकीस आली.
याबाबत समजलेली माहिती अशी की, खानापूर तालुक्यात व परिसरात सध्या भात कापणी व मळणीचे हंगाम सुरू आहे. त्यामुळे गावातील नागरिक आपल्या घरांना कुलूप लावून शेताकडे जात आहेत. याचाच फायदा चोरट्यांनी घेतला आहे. संभाजी भरमु पाटील यांच्या घराचे कुलूप तोडून त्यांच्या घरातील तिजोरी फोडून त्यात ठेवलेले 10 तोळे सोन्याचे दागिने व 25 तोळे चांदीचे दागिने तर गंगाराम पाखरे यांच्या घराचे कुलूप तोडून त्यांच्या घरातील तिजोरीत ठेवलेले 5 तोळे सोन्याचे दागिने, 10 तोळे चांदीचे दागिने व रोख रक्कम 15 हजार चोरट्यांनी लंपास केले आहेत.
याबाबत खानापूर पोलीस स्थानकात गुन्ह्याची नोंद झाली आहे. खानापूर पोलीस स्थानकाचे सीपीआय मंजुनाथ नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय गिरीश एम व गुन्हे अन्वेषण विभागाचे पीएसआय चन्नबसव बबली हे पुढील तपास करत आहेत.