बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील लाखो लोकांचे स्वप्न अखेर साकार झाले. बेळगाव रेल्वे स्थानकावर मंगळवारी बहुप्रतीक्षित वंदे भारत एक्स्प्रेस दाखल झाली आणि मोठ्या संख्येने जमलेल्या बेळगावकरांनी एकच जल्लोष केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील वंदे भारत एक्स्प्रेसने देशभरात चांगलीच लोकप्रियता मिळवली आहे. बेळगावलाही ही एक्स्प्रेस यावी अशी अनेकांची इच्छा होती. मात्र केवळ बेंगळूर ते धारवाड या दरम्यानच वंदे भारत सुरु झाल्याने बेळगावकरांची निराशा झाली होती. बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स, बेळगाव रेल्वे प्रवासी संघटना, लघु उद्योजक संघटना, व्यापारी संघटना आदींनी तसेच लोकप्रतिनिधींनीही वंदे भारतचा विस्तार बेळगावपर्यंत करावा अशी मागणी लावून धरली होती. त्या मागणीला अखेर यश आले असून, आज धारवाडपासून बेळगावपर्यंत प्रायोगिक तत्वावर वंदे भारत एक्स्प्रेसची चाचणी घेण्यात आली. धारवाडहून दुपारी बेळगाव रेल्वे स्थानकावर तिचे आगमन झाले. यावेळी मोठ्या संख्येने बेळगावकर वंदे भारतची एक झलक पाहण्यासाठी जमले होते. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आणि संपूर्ण चकाचक स्वरूपातील वंदे भारत एक्स्प्रेस पाहताच जमलेल्यानी एकच जल्लोष केला. ‘मेक इन इंडिया’ संकल्पनेतून बनवलेल्या आणि त्याचा भव्य लोगो छापलेल्या या रेल्वेचे स्वरूप पाहून सगळेजण भारावले होते. अनेकांनी तिच्याशेजारी थांबून सेल्फी घेतली. आज दुपारी बेळगाव रेल्वे स्थानकावर आगमन झालेल्या वंदे भारत एक्स्प्रेस सायंकाळी उशिरा बेंगळूरकडे प्रयाण केले. या महिन्याच्याच अखेरीपासून बेंगळूर-बेळगाव दरम्यान वंदे भारत नियमित धावण्याची शक्यता आहे. बेंगळूरहून सकाळी 5.45 सुटल्यावर हुबळीला सकाळी 10.55 वा. पोहोचेल. तेथून 11.20 वा. धारवाडला पोहोचेल. धारवाडहून दुपारी 1.30 वा. वंदे भारतचे बेळगाव रेल्वे स्थानकावर आगमन होईल. त्यानंतर 2 वा. ती धारवाडकडे प्रस्थान करेल. धारवाडला दुपारी 4.15 वा. हुबळीला 4.45 वा, पोहोचेल. हुबळीहून सुटल्यावर रात्री 10.10 वा. बेंगळूरला पोहोचणार आहे. वंदे भारताच्या फेऱ्या बेळगावहून नियमित सुरु झाल्यास उद्योजक, व्यापारी, लोकप्रतिनिधी यांच्यासह सर्वच बेळगावकरांची चांगली सोय होणार आहे.