खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती यांच्या वतीने गेल्या बैठकीतील ठरावाप्रमाणे खानापूर अनमोड व्हाया हेम्माडगा रस्ता पुनर्बांधणी करण्याबाबत तहसीलदार आणि संबंधित अधिकाऱ्यांना सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ठीक १० वाजता निवेदन देण्यात येणार आहे. तरी खानापूर तालुक्यातील रुमेवाडी, शेडेगाळी, हारूरी, ढोकेगाळी, मणतुर्गे, तिवोली, देसाईवाडा, अशोकनगर, तेरेगाळी, नेरसे, गव्हाळी, कोंगळा, पाष्टोली, शिरोली, शिरोलीवाडा, मांगिनहाळ, डोंगरगांव, अबनाळी, जामगाव, हेम्माडगा, पाली, देगाव, मेंढील, तळेवाडी, कृष्णापूर आणि होल्डा या ग्रामस्थांनी सोमवारी सकाळी ठीक १० वाजता बहुसंख्येने निवेदन देण्यासाठी राजा शिवछत्रपती स्मारक येथे जमावे असे आवाहन खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष श्री. गोपाळराव देसाई, कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील व निरंजनसिंह सरदेसाई आणि सरचिटणीस आबासाहेब दळवी कळवितात.
रुमेवाडी-अनमोड रस्त्यासाठी सोमवारी निवेदन
खानापूर : रुमेवाडी क्रॉस ते हेम्माडगामार्गे अनमोड रस्त्यावर ठिकठिकाणी रस्ता नादुरुस्त झाला आहे. त्यामुळे प्रवासीवर्ग व स्थानिकांची गैरसोय होत आहे. हा रस्ता दुरुस्त व्हावा यासाठी अनेक वेळा आवाज उठवूनही याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी आता सोमवारी (ता. ११) या रस्त्याच्या दुरुस्तीसंदर्भात खानापूर तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्याचा निर्णय घेतला आहे.
रुमेवाडी क्रॉसपासून हेम्माडगा ते अनमोडपर्यंतचा हा रस्ता सुमारे ३० किमी अंतराचा आहे. या रस्त्यापैकी शेडेगाळी क्रॉस ते मणतुर्गा क्रॉसपर्यंतच्या रस्त्यात अनेक मोठमोठे खड्डे पडले आहेत. तसेच हेम्माडगा ते जोयडा तालुक्याच्या हद्दीत असलेल्या अनमोडपर्यंतचा ठिकठिकाणी रस्ता वाहतुकीस कुचकामी ठरला आहे. त्यासाठी सोमवारी सकाळी ११ वाजता निवेदन देण्यासाठी खानापूर तहसील कार्यालयासमोर उपस्थित राहावे, असे आवाहन ईश्वर बोबाटे यांनी केले आहे.