निवेदनाची दखल न घेतल्यास रास्तारोकोचा इशारा
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर – हेम्माडगा रस्त्याची पुनर्बांधणी करण्यासह सदर मार्गावर सुरु असलेल्या अवजड वाहतुकीला निर्बंध आणावेत या मागणीसाठी, खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे आज सोमवार दि. ११ डिसेंबर २०२३ रोजी खानापूरच्या तहसिलदारांना निवेदन देण्यात आले. तहसिलदारांच्या अनुपस्थितीत उपतहसिलदार कल्लाप्पा कोलकार यांनी निवेदनाची प्रत स्वीकारली असून, याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवून योग्य तो निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले. येत्या काळात निवेदनाची दखल न घेतल्यास पुढील आठवड्यात मणतूर्गा क्रॉस येथे रास्तारोको आंदोलनाचा इशाराही समितीने या निवेदनाद्वारे दिला आहे.
यानंतर पोलिस प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाला या निवेदनाची प्रत देण्यात आली. सार्वजनिक बांधकाम विभागातील जितेंद्र कांबळे आणि पोलिस स्थानकात सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सार्वजनिक यांनी निवेदनाची प्रत स्वीकारली.
खानापूर – हेम्माडगा या रस्त्यावरून गोव्याला जाणाऱ्या अवजड व इतर वाहतुकीत, गेल्या पाच वर्षापासून मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्यामुळे, ह्या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. परिणामी या मार्गावरून प्रवास करताना नागरिकांचे हाल होत आहेत. खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवार दि. २२ ऑगस्ट २०२२ रोजी खानापूरचे तत्कालीन तहसिलदार प्रवीण जैन व सार्वजनिक बांधकाम खात्याचे मुख्य अभियंता हलगी यांना निवेदन दिले होते. परंतु आजतागायत या रस्त्याचे काम झालेले नाही. खानापूर-रामनगर गोवा हा रस्ता नव्याने करण्यासाठी वाहतुकीसाठी बंद केला होता. यामुळे गेल्या पाच वर्षांपासून गोव्याला जाणारी वाहतूक खानापूर – हेम्माङगा व्हाया अनमोड मार्गे सुरु आहे. हा रस्ता अरुंद तसेच जंगलातून जात असल्यामुळे, फक्त या भागातील ५० गावातील जनतेसाठी वाहतुकीसाठी करण्यात आलेला आहे. परंतु अधिकाऱ्यांच्या आशिर्वादाने गोव्याला जाणारी अवजड वाहतुक या रस्त्यावरून सुरूच आहे. त्यामुळे हा रस्ता पुर्णपणे उखडून गेल्याने येथील ५० गावच्या लोकांनाच रस्ता नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या व्यतिरिक्त छोट्या-मोठ्या अपघातांची मालिका सुरुच आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना विनंती करुनही अद्याप कोणतीच दखल घेतलेली नाही. तरी या रस्त्याची लवकरात लवकर नव्याने पुनर्बांधणी करणे तसेच संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना देऊन तात्काळ अवजड वाहतुक बंद करावी असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी माजी आमदार दिगंबरराव पाटील, समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई, कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील, निरंजनसिंह सरदेसाई, सरचिटणीस आबासाहेब दळवी, रणजीत पाटील, प्रकाश चव्हाण, संजीव पाटील, पांडुरंग सावंत, गोपाळराव पाटील, राजाराम देसाई, बाळासाहेब शेलार, जयसिंगराव पाटील, रमेश देसाई, मोहन गुरव, डॉ. एल. एच. पाटील, भीमसेन करंबळकर, म्हात्रू धबाले, शिवाजी गावकर, बी. बी. पाटील, अजित वसंतराव पाटील, अनंत मष्णू पाटील, गोपाळ लक्ष्मण हेब्बाळकर, पुंडलिक लाटगांवकर, शामाणी नागाप्पा मजगावकर, डी. एम. भोसले, ए. आर. मुतगेकर व समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.