खानापूर : खानापूर भाजपचे विद्यमान आमदार विठ्ठल हलगेकर आणि महालक्ष्मी शुगर्स प्रा. लि कारखाना तथा लैलावर सहाशे कोटीचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप माजी आमदार अंजली निंबाळकर यांनी केला होता. त्यानुसार सकाळी दहा वाजल्यापासून निवृत्त न्यायाधीश एस. बी. वस्त्रमठ यांनी कारखान्याच्या कार्यालयात सकाळपासून सखोल चौकशी सुरू केली. सकाळी दहा वाजल्यापासून दुपारी तीन वाजेपर्यंत निवृत्त न्यायाधीश एस. बी. वस्त्रमठ यांनी कारखान्याचे व्यवस्थापक सदानंद पाटील यांच्याशी चर्चा करून सदर चौकशी केली आहे. एकूणच या आरोपावरील तथ्य व न्यायाधीशांनी केलेल्या चौकशीत अंतिम निकष काय बाहेर पडतो याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
राजकीय हेतूने भ्रष्टाचाराचे आरोप
भाग्यलक्ष्मी सहकारी साखर कारखाना 2009 साली भाडेतत्त्वावर देण्यात आला होता. 2002 मध्ये सीओडी चौकशी अंतर्गत 65 कोटीच्या भ्रष्टाचाराचे प्रकरण गाजले होते त्याचा अद्याप छडा लागलेला नाही. भाग्यलक्ष्मी साखर कारखाना पूर्णता रसातळाला गेला होता. 2008 मध्ये भाजपचे तत्कालीन आमदार दिवंगत प्रल्हाद रेमानी यांच्या प्रयत्नानंतर कारखान्याला भाडेतत्त्वावर देण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करण्यात आले. त्यांच्या प्रयत्नांना यश देखील आले व त्यानंतर सदर कारखान्याला उर्जितावस्था प्राप्त झाली. 2009 मध्ये या कारखान्याचे भाडेतत्त्वावर देण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि हैदराबाद येथील लैला शुगर्सने कारखाना 130 कोटीला तीस वर्षाच्या भाडेतत्त्वावर चालविण्यासाठी घेतला. हा करार होत असताना भाग्यलक्ष्मी सहकारी साखर कारखान्याच्या अगोदरच्या भ्रष्टाचार अशी या भाडेतत्त्वावरील करारशी कोणताही संबंध ठेवण्यात आलेला नाही. सदर व्यवहाराची चौकशी प्रशासकीय पातळीवर कायम ठेवण्यात आली मात्र 64 कोटींची चौकशी देखील नंतरच्या काळात बंद पडली. 2009 नंतर लैला शुगर प्रायव्हेट लिमिटेडच्या नावाखालील लैला कंपनीने कारखाना चालवण्यासाठी घेतला. पहिली चार ते पाच वर्षे लैलाने गळीत हंगाम चांगल्या प्रकारे करून तालुक्यातील शेतकऱ्यांना चांगला ऊस दर मिळवून दिला व गणित हंगाम यशस्वी करण्याचा प्रयत्न केला. मागील तीन वर्षांपूर्वी पुन्हा लैला शुगर्स प्रायव्हेट लिमिटेडने कारखाना चालविण्यास असमर्थता दर्शविली. त्यामुळे लैला शुगर कंपनीने हा कारखाना अन्य कंपनीला चालविण्यास देण्याचे ठरविले त्यानंतर तो तोपीनकट्टी महालक्ष्मी ग्रुपचे सर्वेसर्वा विद्यमान आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी स्वबळावर हा कारखाना चालविण्याचा धाडसी निर्णय घेतला व विठ्ठल हलगेकर यांनी गेलेल्या कारखान्याला पुन्हा एकदा उर्जितावस्था मिळवून दिली आणि मागील चार-पाच वर्षांपासून यशस्वीरित्या गळीत हंगाम करून शेतकऱ्यांना योग्य दर देण्यात आला आहे असे असताना सध्या माजी आमदार अंजली निंबाळकर यांनी 600 कोटीच्या भ्रष्टाचाराचा भाग्यलक्ष्मी साखर कारखाना लैला शुगरवर केलेला आरोप राजकीय हेतूने करण्यात आला आहे की काय अशी चर्चा शेतकरी आणि भागधारकातून होत आहे. काँग्रेसच्या माजी आमदार डॉक्टर अंजली निंबाळकर यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे उर्जितावस्था प्राप्त झालेला साखर कारखाना पुन्हा रसातळाला जाणार की काय अशी भीती शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.