खानापूर : खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर यांनी आज विधानसभेत मराठी भाषेत खानापूर तालुक्याच्या समस्या मांडून त्या त्वरित सोडविण्याची मागणी केली.
हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आज विधानसभेत उत्तर कर्नाटकाच्या समस्यांवर चर्चा सुरु राहिली. या दरम्यान, विविध आमदारांनी उत्तर कर्नाटकाच्या समस्यांवर प्रकाशझोत टाकला. या दरम्यान, खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर यांनी आपल्याला कन्नड चांगले येत नसल्याने मराठी भाषेत बोलण्यास परवानगी देण्याची विनंती केली. ती मान्य करून अध्यक्ष यु. टी. खादर यांनी, तुम्हाला जी भाषा येते त्या भाषेत अवश्य बोला असे सांगितले. त्यावर हलगेकर यांनी मराठीत बोलण्यास प्रारंभ करत खानापूर तालुका गोवा आणि महाराष्ट्राच्या मधोमध वसलेला असल्याने या तालुक्यात मराठीचे वर्चस्व असल्याचे सांगून लोकांना मराठीचा अभिमान असल्याचे सांगितले. या दरम्यान, लक्ष्मण सवदी यांनी आक्षेप घेऊन कन्नडमध्येच बोलण्याची सूचना केली. त्यावर अध्यक्ष खादर यांनी हलगेकर यांनी त्यांना कन्नड चांगले येत नसल्याचे आधीच स्पष्ट केले आहे, त्यामुळे त्यांनी मराठीत बोलायला मुभा दिल्याचे सांगून सवदी यांना बसण्याची सूचना केली. त्यानंतर बोलताना आ. हलगेकर यांनी आमच्या तालुक्यात सर्व पक्षांचे नेते, मुख्यमंत्री मते मागायला येतात तेंव्हा चांगले मराठी बोलतात, मग सभागृहात मी मराठी बोललो तर काय बिघडले असा सवाल केला. खानापूर तालुक्यातील जी गवे मराठी भाषक आहेत, तेथील अंगणवाड्यात लहान मुलांना मराठीतच शिकवले पाहिजे. कन्नड अंगणवाडी टीचर पाठवून काय फायदा असा प्रश्न त्यांनी केला. भाषेवरून राजकारण करू नका असे सांगत आ. हलगेकर यांनी कन्नड व मराठीत बोलत, कळसा-भांडुरीप्रमाणेच काटगाळी येथे मोठे धरण बांधण्याची मागणी केली. हे धरण झाल्यास मलप्रभा नदीतून वाया जाणारे पाणी अडवून तालुक्याचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल, शिवाय अन्य भागाला पाणी देणेही शक्य होणार असल्याचे सांगितले. खानापूर तालुक्यात एकूण ९०० किमी लांबीचे रस्ते आहेत. पण एकही रस्ता सुस्थितीत नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. भीमगड अभयारण्य परिसरातील कोंगळा, गव्हाळी आदी खेडी अजूनही विकासापासून वंचित आहेत. त्यांचा विकास करण्याची मागणी त्यांनी केली.यावर बोलताना अध्यक्ष यु. टी. खादर यांनी आपल्या भाषेचा आदर करताना दुसऱ्या भाषेचाही गौरव केला पाहिजे, असे सुनावले. तसेच हलगेकर यांनी चांगले कन्नड येत नसूनही कन्नड बोलण्याचा प्रयत्न केला आहे. जानेवारीतील अधिवेशनात तुम्ही चांगले कन्नड शिकून या असे सुचविले.