खानापूर : खानापूर तालुक्यातील श्री सुब्रम्हण्य साहित्य अकादमी, माचीगड यांच्या वतीने रविवार 24 डिसेंबर रोजी 27 वे मराठी साहित्य संमेलन होणार आहे. संयोजकाकडून संमेलनाची जय्यत तयारी सुरू असून, माचीगड येथे होणारे हे मराठी साहित्य संमेलन खानापूर तालुक्यातील एकमेव मराठी साहित्य संमेलन म्हणून प्रसिद्ध आहे.
वाचन संस्कृती टिकविण्यासाठी प्रतिवर्षी दर्जेदार साहित्यिकांना आमंत्रित करून त्यांच्या व्याख्यानाचा लाभ सर्वदूर पोहोचविण्यासाठी साहित्य अकादमी प्रयत्नशील असते. 1997 पासून माचीगड-अनगडी येथे पहिल्या मराठी साहित्य संमेलनाचा श्रीगणेशा झाला. त्यानंतर आजतागायत माचीगड-अनगडी मुक्कामी २५ संमेलने अतिशय थाटात झाली आहेत. प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही नामवंत साहित्यिकांना बोलाविण्याचा प्रयत्न अकादमीकडून करण्यात येत आहे. यंदाचे संमेलन यशस्वी करण्यासाठी वेगवेगळ्या समित्या स्थापन करण्यात येत आहेत. त्याद्वारे साहित्यिकांना, प्रमुख पाहुण्यांना निमंत्रण देण्याचे कार्य सुरू आहे. गावातील वारकरी सांप्रदाय युवक मंडळे, महिला मंडळे, स्वसाहाय्य संघ, ग्रामपंचायत, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, नवरात्रोत्सव मंडळ, शिवजयंती उत्सव मंडळ यांना सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अकादमीचे अध्यक्ष बाबुराव पाटील, कार्याध्यक्ष संजीव वादुपकर, स्वागताध्यक्ष पीटर डिसोजा, कोषाध्यक्ष नारायण मोरे, सचिव एम. पी. गिरी, प्रा. अजित सागरे, संचालक रामू गुंडप, यल्लाप्पा शिंदे, रामा पवार, तुकाराम कुट्रे, आर. जी. शिंदे, महादेव मोरे, परशराम कोलकार, बसवराज खटावकर, संभाजी बावडेकर, संभाजी शिवठणकर, तम्माणा कोलकार, वाय. एन. कोलकार, तम्माशा पाटील, अरुण कुट्रे, विनायक भुत्तेवाडकर आदी कार्यकर्ते संमेलन तयारीला लागले आहेत.