खानापूर : हेमाडगा रस्ता डागडुजीचे काम प्रशासनाने हाती घेतल्याने महाराष्ट्र एकीकरण समितीचे ज्येष्ठ नेते व सरचिटणीस आबासाहेब दळवी तसेच मणतुर्गा, नेरसा, शिरोली या भागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र हा रस्ता तात्पुरता दुरुस्ती न करता पुनर्बांधणी करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी केली आहे.
खानापूर -अनमोड रस्त्याची दुरवस्था झाली आहे. संपूर्ण रस्ता खड्डेमय झाला आहे तर रस्त्याच्या बाजूपट्ट्या देखील खचल्या आहेत त्यामुळे वाहनधारकांना या रस्त्यावरून प्रवास करणे जिकरीचे बनले आहे. याची दखल घेत महाराष्ट्र एकीकरण समितीने बांधकाम खात्याला निवेदन देऊन हा रस्ता तात्काळ दुरुस्त करण्यात यावा अन्यथा रास्ता रोको करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला होता. याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम खात्याने रस्त्याच्या डागडुजीचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे या भागातील प्रवासी व नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी हा रस्ता दुरुस्ती करण्याबाबत समाधान व्यक्त केले आहे. मात्र खानापूर ते अनमोड वाया हेमाडगा रस्त्याची पुनर्बांधणी करणे गरजेचे आहे. मागील पंधरा वर्षांपासून या रस्त्याची पुनर्बांधणी झालेली नाही. हा रस्ता गोव्याला जाण्यासाठी अत्यंत जवळचा रस्ता आहे. या रस्त्यावरून वाहतूक झाल्यास प्रवाशांना प्रवास करणे सोयीचे होणार आहे. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने त्या रस्त्याची तातडीने पुनर्बांधणी करून हा रस्ता प्रवासासाठी सुरळीत करून द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी केली आहे.