खानापूर : सध्या भात मळणीचे हंगाम सुरू असून मळणी झाल्यानंतर शेतकरी आपल्या शेतातच आपलं भात दलालाना विकत असतात, परंतु कापोली येथे एका शेतवडीत शेतकऱ्यांचे भात खरेदीसाठी आलेल्या दलालावर शेतकऱ्यांना संशय आल्याने त्याची तपासणी केली असता त्याच्या खिशात वजन काटा हाताळण्याचे रिमोट कंट्रोल मिळाले. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे.
भात विकत घेणारे दलाल शेतकऱ्यांच्या शेतातच आपला वजन काटा लावून भात भरत आहेत. परंतु शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन रिमोट कंट्रोलवर चालणारे वजन काटे दलाल वापरत आहेत. आपल्या खिशात रिमोट कंट्रोल ठेवून भात वजन करत असताना रिमोटचे बटन दाबत आहेत. त्यामुळे पन्नास किलोच्या भाताच्या पोत्यामागे पाच ते सात किलो जादा भात दलाल भरत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे फार मोठं नुकसान होत आहे. वजनामध्ये शेतकऱ्यांना संशय आल्याने त्यांनी सदर दलालाच्या कामगाराची तपासणी केली असता, त्याच्या खिशात रिमोट कंट्रोल आढळून आले. त्यानंतर त्यांने आपण आपल्या मालकाच्या सांगण्यावरून हे करत असल्याचे सांगितले. त्यानंतर शेतकऱ्यांनी गावातील वजन काटा आणून पोत्याचे वजन केले असता, एका पोत्यामागे पाच ते सात किलो जादा भात दलालाने भरल्याचे आढळून आले. त्यामुळे शेतकऱ्यांनी शंभर रुपये जास्त दर देत असलेल्या दलाला पासून सावध राहणे गरजेचे आहे. तसेच शेतकऱ्यांनी सदर दलाला पकडून पोलिसाच्या हवाली केलं पाहिजे होतं, परंतु शेतकऱ्यांनी त्याला सक्त ताकीद देऊन तेथून हाकलून लावल्याचे समजते
याबाबत खानापूर पोलिसांनी व तहसीलदारांनी घडलेल्या या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी तालुक्यातील शेतकऱ्यातून होत आहे.