कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश प्रसन्न वराळे यांना मिळणार बढती : सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमची शिफारस
निपाणी (वार्ता) : मूळ गाव निपाणी आणि सध्या कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश प्रसन्न वराळे यांची सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे निपाणीचे सुपुत्र सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून सेवा बजावणार आहेत. न्या. प्रसन्न यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदापर्यंत घेतलेली झेपे मुळे निपाणी तालुक्याच्या शेर पेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
न्यायाधीश प्रसन्न वराळे यांचा जन्म २३ जून १९६२ रोजी निपाणी येथे झाला. त्यांचे आजोबा बळवंतराव हणमंतराव वराळे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. १९३५ मध्ये डॉ. आंबेडकरांच्या बहिष्कृत हितकारणी संस्थेतर्फे धारवाड येथे स्थापन केलेल्या वसतीगृहाचे अधीक्षक म्हणून बळवंतराव काम करत होते. यावेळी १९३६ मध्ये स्वातंत्र्यपूर्व काळात बेळगाव, निपाणी हा भाग मुंबई इलाख्यात होता. त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या स्वतंत्र मजूर पक्षाचे १६ आमदार मुंबई इलाख्यात निवडून आले होते. त्यापैकीच बेळगाव विभागाचे आमदार म्हणून बळवंतराव वराळे यांनी सेवा बजावली. बळवंतराव यांनी निपाणीत देवचंद शहा यांच्या सहकार्याने तंबाखूचा व्यवसाय सुरू केला. येथील देवचंद महाविद्यालयाच्या स्थापनेत त्यांचाही सहभाग होता. त्यांचे पुत्र भालचंद्र वराळे यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण निपाणीतील म्युनिसिपल हायस्कूल येथे झाले. यानंतर त्यांनी औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली. त्यांनाही डॉ. आंबेडकरांचा सहवास लाभला. त्यानंतर त्यांनी लातूर, अकोला, शिरपूर, नांदेड, सांगली याठिकाणी कनिष्ठ दिवाणी न्यायाधीश व जिल्हा न्यायाधीश म्हणून काम केले. भालचंद्र यांचे पुत्र असलेल्या न्यायाधीश प्रसन्न यांचा जन्म निपाणीत झाला. त्यांचे शालेय शिक्षण लातूर व नांदेड या ठिकाणी झाले.
वडिलांच्या प्रभावाने त्यांना कायद्याच्या अभ्यासाची आवड निर्माण झाली. यातून त्यांनी औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली. १९९० ते १९९२ या काळात औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कायदा महाविद्यालयात त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केले. यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अतिरिक्त सरकारी वकील म्हणून काम सुरु केले. २००८ पासून ते मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून सेवा बजावत होते. राष्ट्रपतींच्या सूचनेनुसार केंद्र सरकारने न्यायाधीश प्रसन्न वराळे यांची ऑक्टोबर २०२२मध्ये कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नेमणूक केली. तव्हापासून आजतागायच प्रसन्न हे कर्नाटकचे मुख्य न्यायाधीश म्हणून काम पाहत आहेत. आता लवकरच ते सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून सेवा बजावणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश संजय किशन कौल २५ डिसेंबर रोजी निवृत्त झाले. यानंतर त्यांच्या जागेवर उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची बढतीवर नेमणूक केली जाते. उच्च न्यायालयांमध्ये मुख्य न्यायाधीश म्हणून कार्यरत असलेल्यांची सेवाज्येष्ठता, प्रदेश आणि जातीचे प्रतिनिधित्व लक्षात घेऊन प्रसन्न वराळे यांना रिक्त पदावर पदोन्नती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तशी शिफारस केंद्र सरकारला करण्यात आली असून यामुळे निपाणी शहरवासीयांचा ऊर मात्र अभिमानाने फुलला आहे.
——————————————————————-
उच्च न्यायालयांमध्ये एकमेव दलित न्यायाधीश
सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या रिक्त जागेवर नेमणूक करताना मुख्य न्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या कॉलेजियमने सर्व बाजूंनी विचार केला. सेवा जेष्ठतेबरोबरच देशातील सर्व राज्यांमध्ये असलेल्या उच्च न्यायालयांच्या मुख्य न्यायाधीशांमध्ये प्रसन्न वराळे हे एकमेव दलित न्यायाधीश आहेत. शिफारसी नंतर अधिकृत नेमणूक होताच न्यायमूर्ती प्रसन्न वराळे हे सर्वोच्च न्यायालयातील सध्या कार्यरत असलेल्या एकूण न्यायाधीशांमध्ये तिसरे दलित न्यायाधीश असणार आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta