बेळगाव : जनतेत भाषिक तेढ निर्माण केल्याच्या आरोपातून समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते मधु कणबर्गी यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.
जोपर्यंत सीमा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही अशी शपथ घेतलेले मधु कणबर्गी यांची आज एका न्यायालयीन खटल्यातून निर्दोष मुक्तता झाली. 2014 च्य लोकसभा निवडणुकीत मराठी उमेदवार नसल्यामुळे नोटाचा पर्याय वापरा म्हणून मधु कणबर्गी यांनी जाहीर पत्रक काढून ती मराठी माणसात वाटली व नोटा पर्यायाला मतदान करण्यासाठी जनजागृती केली. त्यावेळी निवडणूक अधिकाऱ्यांनी खडेबाजार पोलिसांसमवेत जाऊन त्यांच्यावर मराठी व कानडी भाषिकांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ठेवून खडे बाजार पोलीस स्थानकात मधु कणबर्गी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यासंबंधी पोलिसांनी तृतीय जेएमएफसी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करून साक्षी पुरावे नोंदविले होते. पत्रके देखील न्यायालयात सरकारी पक्षांतर्फे सादर करण्यात आली होती. पण सरकारी पक्षाला गुन्हा सिद्ध करता आला नाही म्हणून तृतीय जेएमएफसी न्यायालयाने मधु कणबर्गी यांची निर्दोष मुक्तता केली. मधु कणबर्गी यांच्यातर्फे वकील महेश बिर्जे, एम. बी. बोंद्रे, शंकर पाटील, बाळासाहेब कागलकर आणि वैभव कुठरे यांनी न्यायालयात बाजू मांडली.