खानापूर : शिवसेना सीमाभाग आणि लोककल्याण आरोग्य केंद्र मुंबई यांच्यावतीने हलशीवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिराला प्रशासनातर्फे आठकाठी करण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेचा मराठी भाषिक आणि महाराष्ट्र एकीकरण समितीने जाहीर निषेध नोंदविला आहे. तसेच कोणत्याही प्रकारची माहिती न घेता आयोजकांना त्रास देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि लोक कल्याण आरोग्य केंद्र मुंबई यांच्यावतीने विविध ठिकाणी आरोग्य शिबिरांचे आयोजन करून नागरिकांना मोफत औषधांसह चष्म्याचे वितरण केले जात आहे. त्याचा आतापर्यंत हजारो लोकांना लाभ झाला आहे त्यामुळे हलशीवाडी येथे शुक्रवारी सकाळी दहा वाजल्यापासून आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याबाबत गावासह हलशी, गुंडपी व इतर गावांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली होती. मात्र आरोग्य शिबिरासाठी शिवसेना आणि मुंबई येथील पथक दाखल होणार असल्याची माहिती मिळताच गुरुवारी सकाळपासून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांसह पोलीस अधिकाऱ्यांनी आरोग्य शिबिरासाठी परवानगी घेतली आहे का, तसेच महाराष्ट्र सरकार यासाठी मदत करीत आहे का अशी विचारणा करीत शिबिर रद्द करा असे सांगत सातत्याने दबाव टाकण्यात आला. तसेच जिल्हा प्रशासनाकडून देखील आरोग्य शिबिर कशासाठी आयोजित करण्यात आले आहे याची माहिती संकलित करण्याचे काम दुपारपर्यंत सुरू होते त्यामुळे आरोग्य शिबिर रद्द करण्याची वेळ हलशीवाडी ग्रामस्थांवर आली आहे. तसेच ज्या ठिकाणी शिबिर होणार आहे त्या ठिकाणीही पोलिसांनी नजर ठेवीत मराठी भाषिकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू केला आहे त्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे.
………….…………………………………………………………….
सीमाभागातील मराठी भाषिकांना महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ देण्याचा महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतल्यापासून महाराष्ट्र सरकारच्या योजनेचा लाभ मराठी भाषिकांना मिळू नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तसेच काही दिवसांपुर्वी ज्या ठिकाणी योजनेचे अर्ज भरून घेण्यासाठी केंद्र सुरू करण्यात आली होती ती केंद्र देखिल बंद करण्याची सूचना करण्यात आली होती
…………….…………………………………………………………..
प्रतिक्रीया
शिवसेना 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण करते. त्यामुळे दरवर्षी विविध भागात आरोग्य शिबिरांचे आयोजन केले जाते.
मात्र ज्या गावात पहिल्यांदाच आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते त्या ठिकाणी आरोग्य शिबिराला विरोध करणे अतिशय चुकीचे आहे.
– प्रकाश शिरोळकर, शिवसेना जिल्हाप्रमुख
……..…….………………………………………………………….
महाराष्ट्र सरकारची कोणतीही मदत मराठी भाषिकांना मिळू नये यासाठी कर्नाटकी प्रशासन प्रयत्न करीत आहे हे अतिशय चुकीचे असून ग्रामीण भागातील नागरिकांना चांगली आरोग्य सुविधा मिळावी यासाठी आयोजित करण्यात आलेले शिबिर रद्द करण्याची सूचना करणे अतिशय चुकीचे आहे. याबाबत येणाऱ्या काळात आवाज उठवला जाईल तसेच ही बाब महाराष्ट्र सरकारच्या निदर्शनास आणून दिली जाईल.
– आबासाहेब दळवी, सरचिटणीस, खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती
…………….………………………………………………………….
खानापूर तालुक्यात हलशीवाडी या ठिकाणी गावकरी तसेच मुंबई येथील एक संस्था व शिवसेना यांच्या माध्यमातून आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, पण त्यातही येथील कर्नाटकी प्रशासन आडकाठी घालत आहे, गेले दोन दिवस मला पोलिसांचा फोनद्वारे ससेमिरा सुरू आहे की महाराष्ट्रातून कोण नेते येणार आहेत का, किती जणांची ऑनलाइन नोंदणी झाली आहे, तुम्ही असे कार्यक्रम घेऊ शकत नाही अशा प्रकारची विचारणा सुरू आहे, असेच सुरू राहिले तर सीमावासीयांचे आरोग्य विषयी सुविधा ही धोक्यात येणार आहे.
– धनंजय पाटील, अध्यक्ष, खानापूर तालुका युवा समिती
…………….………………………………………………………….
आरोग्य शिबिराच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचे राजकारण केले जाणार नाही अशी माहिती पोलीस प्रशासनाला देण्यात आली. तसेच शालेय विद्यार्थी आणि नागरिकांना लाभ व्हावा यासाठी आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे असे सांगण्यात आल्यानंतर देखील महाराष्ट्रातून किती लोक येणार आहेत आणि परवानगी घेतला की नाही असे सांगत त्रास देण्याचा प्रयत्न करण्यात आला ही दुर्दैवी गोष्ट आहे.
– वामन देसाई, हलशीवाडी