
खानापूर : खानापूर – गर्लगुंजी मार्गावर कॉलीस आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत बेकवाड (ता. खानापूर) येथील दोघे दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज रविवार दिनांक 4 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 8:30 च्या दरम्यान घडली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की बेकवाड येथील रामलिंग (अप्पी) पांडुरंग मुतगेकर (वय 20) व हणमंत महाबळेश्वर पाटील (वय 19) हे दोघेजण नंदीहळ्ळी या ठिकाणी असलेल्या खासगी मिलिटरी प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेण्यासाठी दररोज दुचाकीवरून ये-जा करत होते. आज नेहमीप्रमाणे ते नंदीहळ्ळी गावाकडे जात असताना, सन्नहोसूर गावाजवळ कॉलीस जीप गाडी व दुचाकीची समोरासमोर धडक होऊन दोघेही युवक जागीच ठार झाले. खानापूर पोलिसांनी जागेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी खानापूर येथील प्राथमिक आरोग्य चिकित्सा केंद्रात आणला आहे. अपघाताची माहिती समजतात खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी घटनास्थळी भेट दिली.
येत्या 28 फेब्रुवारीला बेकवाड गावची श्री महालक्ष्मीची जत्रा होणार असल्याने संपूर्ण गाव जत्रेच्या तयारीत असताना ही दुःखद दुर्घटना घडल्याने संपूर्ण बेकवाड गावावर दुःखाची छाया पसरली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta