खानापूर : मुलगा हा वंशाचा दिवा असतो. मृत्यूनंतर मुलाने मुखाग्नी दिली तरच मोक्ष प्राप्त होतो. अश्या बुरसटलेल्या विचारांना बगल देत आपल्या मृत आईवर मुलीने अंत्यसंस्कार केल्याची घटना खानापूर तालुक्यातील करंबळ येथे नुकतीच घडली.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की मूळच्या करंबळ येथील व सध्या कारलगा येथील रहिवासी प्रभावती शंकर कवळेकर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांना दोन मुलीच असल्यामुळे त्या आपली मुलगी अमृता काद्रोळकर यांच्याकडे राहत होत्या. वृद्धापकाळात अमृता या आपल्या आईची व्यवस्थित सेवा करीत होत्या. शनिवारी प्रभावती यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांना मुलगा नसल्यामुळे अंत्यसंस्कार कोणी करायचे याबाबत नातेवाईकांमध्ये चर्चा सुरू झाली. त्यांची मुलगी अमृता हिने स्वतः आपल्या आईवर अंत्यसंस्कार करणार असल्याचे सांगितले. मुलीच्या या इच्छेला गावकऱ्यांनी व नातेवाईकांनी पाठिंबा दिल्यामुळे करंबळ या त्यांच्या मूळ गावी मृत प्रभावती यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आईच्या निधनानंतर मुलाचे कर्तव्य मुलीने पार पाडत आईला मुखाग्नी दिला.