खानापूर : निवडणुका हा सीमालढ्याचा एक भाग आहे. म्हणूनच समितीचे अस्तित्व टिकविण्यासाठी तसेच मराठी भाषिकांचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी समितीला निवडणूक लढवावीच लागेल, असा सुर युवा कार्यकर्त्यातून उमटत असल्यामुळे खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने यंदाची लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय बैठकीत घेतला आहे.
खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे महत्त्वपूर्ण बैठक मंगळवार दिनांक 26 रोजी राजा शिवछत्रपती स्मारक येथे पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी गोपाळराव देसाई होते.
कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार अनेक मतमतांतरानंतर पहिल्यांदाच कारवार लोकसभा मतदारसंघातून महाराष्ट्र एकीकरण समितीने निवडणूक लढविण्याचा निर्धार केला आहे. येत्या दोन दिवसात इच्छुकांचे अर्ज मागवून निवड प्रक्रिया करून उमेदवार जाहीर करण्यात येणार आहे, असे महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई यांनी बोलताना सांगितले.
यावेळी माजी आमदार दिगंबर पाटील, ज्येष्ठ नेते मारुतीराव परमेकर, बाळासाहेब शेलार, कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील, निरंजन सरदेसाई, आबासाहेब दळवी, रणजीत पाटील, राजाराम देसाई, बी. एन. पाटील, सीमासत्याग्रही नारायण लाड, एन. एन. पावले, मोहन गुरव, भास्कर पाटील, अमृत पाटील, कृष्णाजी दौलतकर, अनंत पाटील, डी. एम. गुरव, रामचंद्र गावकर, माजी जि. पं. सदस्य जयराम देसाई, माजी ता. पं. सदस्य विठ्ठल गुरव, रवींद्र शिंदे, शामराव पाटील, पुंडलिक पाटील, रमेश धबाले, मुकुंद पाटील, ऍड. अरुण सरदेसाई, डी. बी. पाटील, प्रकाश चव्हाण, पांडुरंग सावंत, गोपाळ पाटील, यशवंत बिर्जे, संदेश कोडचवाडकर, कृष्णा कुंभार, सीमा सत्याग्रही पुंडलिक चव्हाण, गंगाराम पाटील आदींनी आपले विचार मांडले.
यावेळी बहुसंख्य समितीनिष्ठ कार्यकर्त्यांनी निवडणूक लढविण्याबाबत एकमत दर्शविल्यामुळे कारवार लोकसभा मतदारसंघातून महाराष्ट्र एकीकरण समितीने निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले आहे.