खानापूर : खानापूर तालुक्यातील कणकुंबी चेकपोस्टवर समर्पक कागद्पत्रांविना वाहनातून नेण्यात येणारी 7,98000/- लाख रुपये रक्कम निवडणूक अधिकाऱ्यांनी जप्त केली. 14-खानापूर विधानसभा मतदार संघातील खानापूर तालुक्यातील कणकुंबी तपासणी नाक्यावर गोव्याहून येणारी केए-29 एफ-1532 क्रमांकाची कार एसएसटी पथकाने अडवून तपासणी केली. बैलहोंगल तालुक्यातील गांधीनगर गल्ली, वन्नुर येथील संजय बसवराज रेड्डी ही कार घेऊन गोव्याहून बेळगावला येत होते. कारच्या तपासणीत 7,98000/- लाख रुपये रक्कम आढळून आली. त्याविषयी रेड्डी हे योग्य कागदपत्रे सादर करू शकले नाहीत. त्यामुळे सदर रक्कम जप्त करण्यात आली. याप्रकरणी निवडणूक अधिकाऱ्यांनी निवडणूक कायद्यानुसार गुन्हा नोंदवून जप्त केलेली रक्कम खानापूर शासकीय उपकोषागारात जमा केली आहे.