सर्व समाजासह ‘मराठा’ हितासाठी कटिबद्ध : डॉ. अंजली निंबाळकर
खानापूर : विकासापासून वंचित असलेल्या सर्व घटकांच्या उन्नतीबरोबरच मराठा समाजाच्या सर्वंकष विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही कारवार लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर यांनी दिली. मतदारसंघातील मराठा समाजाच्या प्रमुखांसोबत त्यांनी रविवारी (दि. ७) शिर्सीतील बैठकीत चर्चा केली. त्यावेळी त्या बोलत होत्या. विरुपाक्ष स्वामी अध्यक्षस्थानी होते.
त्या पुढे म्हणाल्या, कर्नाटकच्या विधानसभेत कन्नडसह मराठी भाषेतून सातबारा उतारे व सरकारी कागदपत्रे द्यावीत यासाठी आवाज उठवला. मराठा समाजाला २ अ प्रवर्गात आरक्षण मिळावे यासाठी यापुढेही आपला संघर्ष सुरुच आहे. या निवडणुकीत काँग्रेसने मराठा समाजाला प्रतिनिधित्व करण्याची संधी उपलब्ध करुन दिली असून मतदारसंघातील अडीच लाखावरील मराठा समाज बांधव नक्कीच या संधीचा विनियोग करतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
राष्ट्रीय मराठा पक्षाचे उपाध्यक्ष श्यामसुंदर गायकवाड म्हणाले, मराठा समाजावरील अन्याय दूर करण्यासाठी डॉ. निंबाळकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहे. शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या मराठा समाजाचे संघटन करून ३ बी मधून २ ए मध्ये मराठा समाजाचा समावेश करण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत. भाजपने मराठा समाजाचा केवळ सत्तेसाठी वापर केला आहे. याउलट काँग्रेसने अनेक ठिकाणी मराठा समाजाला प्रतिनिधित्व दिल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी खानापूर वकील संघटनेचे अध्यक्ष ऍड. ईश्वर घाडी, तालुका ग्राम पंचायत सदस्य संघटनेचे अध्यक्ष विनायक मुतगेकर, मंगला काशिलकर (हल्याळ), शिर्सी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष जगदिश गौडा, जोतिबा शिवणगेकर, विनोद साळुंखे (निपाणी) आदी यावेळी उपस्थित होते.