खानापूर : उत्तर कर्नाटक लोकसभा मतदारसंघात भाजपाला मोठे खिंडार पडले असून यल्लापुरचे आमदार शिवराम हेब्बार यांचे चिरंजीव व युवा नेते विवेक हेब्बार यांनी आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला. उत्तर कन्नड लोकसभा मतदारसंघातील एकूण दहा विधानसभा मतदारसंघापैकी पाच विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे आमदार आहेत. शिरशी, यल्लापूर या ठिकाणी काँग्रेसला सोडचिट्टी देऊन भाजप प्रवेश केलेले तथा गेल्या 2023 मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपची उमेदवारी घेऊन निवडून आलेले भाजपचे आमदार शिवराम हेब्बार यांचे चिरंजीव विवेक हेब्बार यांनी भाजप पक्षाला सोडचिट्टी देऊन काँग्रेसचा हात धरल्यामुळे भाजपला मोठे खिंडार पडले आहे. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या यल्लापुर, शिरशी या भागात आता काँग्रेसची ताकद वाढली असून काँग्रेसच्या उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर यांचा आता विजयाचा मार्ग अधिकच सुखकर झाला आहे.
केपीसीसीचे उपाध्यक्ष इव्हान डिसोझा यावेळी बोलताना म्हणाले, देशभरात सुरु असलेले भाजपची हुकूमशाही वर्तन सुधारण्यासाठी परिवर्तन सुरू झाले आहे. भाजपला पराभूत करून लोकशाही वाचवण्यासाठी मोठ्या संख्येने लोक भाजप सोडून काँग्रेसमध्ये दाखल होत आहेत. भाजपविरोधात मोठी लाट असून यावेळी मतदारांनी काँग्रेसचे उमेदवार डॉ. निंबाळकर यांना विजयी करण्यासाठी सर्वांनी मेहनत घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष साई गावकर यांनी विवेक हेब्बार यांच्या प्रवेशाने काँग्रेसची ताकद वाढल्याचे सांगितले. यावेळी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष सी. एफ. नाईक, माजी सेवादल प्रमुख शंकरगौडा पाटील, केपीसीसी सरचिटणीस व्यंकटेश हेगडे होसाबळे, सतीश नाईक, आर. एच. नाईक, रवी नाईक आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.