Friday , November 22 2024
Breaking News

सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी निवडणूक लढविणे गरजेचे : बाळासाहेब शेलार

Spread the love

 

खानापूर : तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक दिनांक 12 एप्रिल रोजी शिवस्मारक कै. व्ही. वाय. चव्हाण सभागृह येथे पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई हे होते. आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात पुढील नियोजन करण्यासाठी ही बैठक बोलवण्यात आली होती. बैठकीला महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकारी सदस्य त्याचप्रमाणे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
राजाराम देसाई म्हणाले की, महाराष्ट्र एकीकरण समितीने यापूर्वीच लोकसभा निवडणूक लढविली असती तर समितीचे अस्तित्व अबाधित राहिले असते समितीने लोकसभा निवडणूक न लढविल्यामुळे मराठी भाषिक मतदार हे राष्ट्रीय पक्षाकडे वळले गेले ते परत कधी स्वगृही परतलेच नाही त्यामुळे समितीची मते अबाधित राखायची असतील तर लोकसभा निवडणूक लढविणे गरजेचे आहे असे सांगत त्यांनी निवडणूक निधी म्हणून स्वतः 10 हजार रुपयांची देणगी जाहीर केली. त्याचप्रमाणे जी. एल. हेब्बाळकर गुरुजी यांनी देखील पाच हजार रुपयांची देणगी
समितीला दिली आहे.
मध्यवर्ती सदस्य बाळासाहेब शेलार बोलताना म्हणाले की, यापूर्वीच ठरल्याप्रमाणे महाराष्ट्र एकीकरण समितीने कारवार लोकसभा निवडणूक ही लढविलीच पाहिजे. याआधी समितीने कधीच निवडणूक लढविली नव्हती मात्र याचा अर्थ असा होत नाही की यापुढे देखील ती लढू नये. मागील दोन-तीन बैठकांमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचे जबाबदार नेते व माजी लोकप्रतिनिधी अनुपस्थित आहेत याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. सीमाप्रश्न सोडविण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले आहेत त्याचबरोबर समितीच्या जीवावर अनेकांनी विविध पदे देखील भूषवलेली आहेत आणि तेच लोक आज बैठकीला अनुपस्थित आहेत त्यांच्या या कृतीचा या नेते मंडळींनी गांभीर्याने विचार करावा असे ते म्हणाले.
आजच्या बैठकीला अनुपस्थित असलेल्या माजी लोकप्रतिनिधींना निवडून देत असताना महाराष्ट्र एकीकरण समितीच्या प्रत्येक कार्यकर्त्याने तन-मन-धन अर्पण करून त्यांच्यासाठी काम केलेले आहे आणि आज समिती बळकट करण्याची गरज असताना या नेते मंडळींनी समितीकडे पाठ फिरविणे हे कितपत योग्य आहे. याचा विचार त्यांनी करावा तसेच महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवाराला जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून देण्यासाठी तन-मन-धनाने प्रत्येकाने प्रयत्न करावेत असे, ते यावेळी म्हणाले.

माजी जिल्हा पंचायत सदस्य जयराम देसाई म्हणाले की, निरंजन सिंह सरदेसाई यांची उमेदवारी महाराष्ट्र एकीकरण समितीने घोषित केलेली आहे सीमाप्रश्न जोवर सुटत नाही तोवर मराठी भाषिक एकत्र राहणार अशी शपथ आमच्या पूर्वजांनी घेतलेली आहे आणि त्याचा मान राखत आपण जोवर सीमा प्रश्न सुटत नाही तोवर एकसंघ होऊन हा लढा दिला पाहिजे विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मिळविण्यासाठी रसिकेच केली जाते. मात्र लोकसभेसाठी धाडस दाखवणाऱ्या या युवा कार्यकर्त्याचे आपण कौतुक केले पाहिजे आणि निरंजनसिंह सरदेसाई यांच्या पाठीशी प्रत्येक मराठी भाषिकांना उभे रहात आपला मराठी बाणा दाखविला पाहिजे असे देखील ते यावेळी म्हणाले. त्याचप्रमाणे जैनकोप येथील येथील युवक तानाजी गुरव यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीला निवडणूक निधी म्हणून 11000 रुपयाची देणगी यावेळी जाहीर केली. तानाजी गुरव हे वयाच्या तेरा वर्षापासून जयसिंगपूर येथे वास्तव्यास आहेत मात्र त्यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीची आपली नाळ तुटू दिलेली नाही ही बाब कौतुकास्पद आहे.
संजीव पाटील कुप्पटगिरी हे बोलताना म्हणाले की, निरंजन सरदेसाई यांना महाराष्ट्र एकीकरण समितीने उमेदवारी दिलेली आहे त्यांच्या पाठीशी राहणे हे प्रत्येक कार्यकारणी सदस्यांचे तसेच कार्यकर्त्यांचे कर्तव्य आहे. मराठी भाषिक म्हणून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवाराच्या पाठीशी राहत असताना आपण स्वतः सोबत आपल्या संपूर्ण कुटुंबीयांसमवेत महाराष्ट्र एकीकरण समितीला पाठिंबा द्यावा. हल्ली युवा पिढी राष्ट्रीय पक्षाकडे वळत चाललेली आहे त्या अनुषंगाने बाप समिती कार्यकर्ता तर मुलगा राष्ट्रीय पक्षांचा कार्यकर्ता असे होत असताना दिसत आहे अशी विसंगती न राहता प्रत्येकाने स्वतःला समितीच्या प्रवाहात वाहून घेणे हे गरजेचे आहे. दोनशे पाचशे रुपयांसाठी लाचारी पत्करून राष्ट्रीय पक्षांची गुलाम बनू नका तर स्वाभिमानाने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पाठीशी राहा असे देखील ते यावेळी म्हणाले.
मारुतीराव परमेकर बोलताना म्हणाले की, मागील बैठकीत लोकसभेसाठी उमेदवार द्यावा की देऊ नये यासाठी मतमतांतरे झाली पण बहुसंख्या कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार समितीने उमेदवार देण्याचे ठरविले आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मतदारांना मत स्वातंत्र्य दिल्यास ते राष्ट्रीय पक्षाच्या दावणीला बांधले जात आहेत त्यामुळे समितीची ताकद कमी होत चाललेली आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीची मते अबाधित राखायची असल्यास यापुढे येणारी प्रत्येक लोकसभा महाराष्ट्र एकीकरण समितीनेही लढविलीच पाहिजे. लोकसभेत पराभव पदरी पडणार हे माहिती असून सुद्धा निरंजन सरदेसाई यांनी केलेले हे धाडस कौतुकास्पद आहे त्यामुळे मराठी भाषिक म्हणून प्रत्येक मराठी भाषिकांनी निरंजन सरदेसाई यांच्या पाठीशी राहणे गरजेचे आहे.
विलासराव बेळगावकर बोलताना म्हणाले की, बैठकीत काही निर्णय आपल्या मनाविरुद्ध झाले म्हणून बैठकीला अनुपस्थित न राहता संघटनेने घेतलेल्या निर्णयाशी बांधील राहून कार्य करणे हे प्रत्येक नेत्याचे कर्तव्य आहे. त्यामुळे सर्व आजी-माजी लोकप्रतिनिधींनी आणि समितीच्या ज्येष्ठ नेत्यांनी मिळून मराठी भाषेसाठी एकत्रित काम करूयात व आपले मराठीत संस्कृती व मराठी भाषा टिकू यात स्वेच्छेने निवडणूक लढविण्यासाठी तयार झालेल्या कार्यकर्त्याच्या पाठीशी राहणे हे आपले कर्तव्य आहे असे ते म्हणाले.
सरचिटणीस आबासाहेब दळवी बोलताना म्हणाले की, लोकसभेला महाराष्ट्र एकीकरण समितीने उमेदवार देणे हे गरजेचेच आहे. यापूर्वीपासूनच लोकसभा निवडणुकी महाराष्ट्र एकीकरण समितीने लढविली गेली असती तर समिती कार्यकर्ते समितीची बांधील राहिले असते ते न झाल्यामुळे आज समितीला गळती लागलेली आहे. समिती बळकट करण्यासाठी येणारी प्रत्येक निवडणूक लढविणे हे गरजेचे आहे.
लोकसभेचे उमेदवार निरंजन सरदेसाई म्हणाले की, महाराष्ट्र एकीकरण समितीचे अस्तित्व टिकविण्यासाठी आपण सर्वांनी मिळून ही निवडणूक लढवू या व समितीचे अस्तित्व टिकवूया. आपण सर्वजण मराठी भाषिक आहोत व जन्माने आपण हिंदू आहोत हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करून राष्ट्रीय पक्ष हिंदू हिंदूंमध्ये भांडण लावत आहेत. त्यामुळे आपण सर्वांनी एकसंघ होऊन हा लढा दिला पाहिजे व मराठी भाषा व मराठी संस्कृती टिकविली पाहिजेत.
अध्यक्षीय भाषणात गोपाळ देसाई म्हणाले की, समितीने निरंजन सरदेसाई यांची उमेदवारी दिलेली आहे लवकरच उमेदवारी अर्ज भरून निवडणूक प्रचारकार्याला सुरुवात करूयात तसेच योग्य ठिकाणी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यालयाचे लवकरच उद्घाटन करूयात व महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवाराला जास्तीत जास्त मते मिळवून मराठीचे अस्तित्व जपूया असे ते यावेळी म्हणाले.
शेवटी आभार कृष्णा कुंभार उपाध्यक्ष गर्लगुंजी विभाग यांनी मांडले.

About Belgaum Varta

Check Also

खानापूर पट्टन पंचायतसाठी तिघांची नामनियुक्त नगरसेवक म्हणून नियुक्ती

Spread the love खानापूर : कर्नाटक सरकारने खानापूर पट्टन पंचायतसाठी तीन जणांना नामनियुक्त नगरसेवक म्हणून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *