खानापूर : कारवार लोकसभा मतदारसंघात मराठी भाषिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे बॅलेट पेपरवर मराठीतून नावे समावेश करावी तसेच माहिती आणि मतदार यादी मराठी भाषेतून उपलब्ध करून द्यावी अशी मागणी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने कारवारच्या जिल्हाधिकारी गंगुबाई मानकर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
कारवार लोकसभा मतदार संघातील खानापूर, हलियाळ, जोयडा व कारवार भागात मराठा समाज व मराठी भाषिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे तसेच कोंकनी भाषिक देखिल अधिक संख्येने आहेत या सर्वांच्या सोयीसाठी निवडणूक प्रक्रियेवेळी बॅलेट पेपरवर फक्त कन्नड व इंग्रजीतून नावे न देता मराठी भाषेतूनही नावे द्यावीत अशी व मराठी भाषेतून माहिती आणि मतदार यादी मराठी भाषेतून उपलब्ध करून द्यावी त्यामुळे मराठी भाषिकांची सोय होइल असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यावेळी जिल्हाधिकारी मानकर यांनी तुम्ही उशिरा मागणी केला आहात तरीही याबाबत निवडणूक विभागाला माहिती देऊन मराठीतूनही माहिती उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जाते असे आश्वासन दिले आहे.
खानापूर समितीचे कार्याध्यक्ष निरंजन सरदेसाई, रमेश धबाले, मुकुंद पाटील, अभिजित सरदेसाई, नागेश भोसले, संदेश कोडचवाडकर आदी उपस्थित होते.