खानापूर : सर्वत्र प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. प्रचाराचा ताण असून देखील कारवार लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार डॉ. अंजलीताई निंबाळकर यांनी रात्रीच्या अंधारात रस्त्याशेजारी जखमी अवस्थेत पडलेल्या दुचाकीस्वाराला प्रथमोपचार देऊन माणुसकीचे दर्शन घडविले.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, हल्याळ येथील प्रचार आटोपून डॉ. अंजलीताई निंबाळकर या शिरशी येथे निघाल्या असता वाटेत विनायक शेट्टर नामक तरुण गाडीवरून घसरून पडला होता. रात्रीच्या अंधारात तो वेदनेने विव्हळत पडलेला डॉ. अंजलीताई निंबाळकारांच्या निदर्शनास येताच त्यांनी तातडीने आपले वाहन थांबवून त्या तरुणाची विचारपूस करत धीर दिला आणि त्या जखमी तरुणावर प्रथमोपचार केले आणि सदर तरुणाला स्वतःच्याच गाडीतून शिरशी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्या दुचाकीस्वाराच्या हाताला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. स्वतःच्या निवडणूक प्रचाराच्या गडबडीत देखील डॉ. अंजलीताई निंबाळकर यांनी माणुसकीचे दर्शन दाखविले.