खानापूर : कारवार लोकसभा मतदार संघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार निरंजन सरदेसाई यांच्या प्रचारासाठी तिनई घाट, अनमोड आदी भाग पिंजून काढण्यात आला असून सर्वच भागातून समितीला मोठया प्रमाणात मतदान करण्याचा निर्धार करण्यात आला आहे.
समितीचे उमेदवार सरदेसाई यांच्या प्रचारासाठी गुरूवारी तिनईघाट, कातळेगाळी, देवळी, बरलकोड, जळकट्टी, दुस्की, कोणशेत, अनमोड, पारडा, वटले, अबनाळी, रंगरुख, अबनाळी जामगाव आदी भागात प्रचार फेरी काढण्यात आली. अनेक ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करून फेरीचे स्वागत करण्यात आले यावेळी समितीच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन पत्रकांचे वाटप करून समितीला मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळी अनेक नागरिकांनी मराठी भाषा आणि संस्कृती टिकवण्यासाठी समितीने हाती घेतलेले कार्य चांगले असून मतदान करण्यासाठी पर्याय दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
यावेळी समिती नेते दत्तू कुट्रे यांनी जोयडा भागात मराठा समाज आणि मराठी भाषिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र गेल्या काही वर्षात या भागातील मराठी भाषिकांचे वर्चस्व कमी करण्यासाठी कर्नाटकी प्रशासन सातत्याने प्रयत्न करीत आहे त्यामुळे कारवार मतदारसंघात मराठी भाषा आणि संस्कृती टिकवण्यासाठी नागरीकानी पुढे येणे गरजेचे आहे. खानापूर तालुक्यात समितीला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. त्याचप्रमाणे जोयडा, हलीयाळ या भागातूनही अधिक प्रमाणात मतदान व्हावे यासाठी जास्तीत जास्त गावातील नागरिकांपर्यंत जाऊन पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे त्यामुळे यावेळी समितीला चांगले यश मिळेल असा विश्वास आहे. दुर्गम भागातील अनेक गावांमध्ये अद्याप विकास झालेला नाही त्याकडेही लक्ष देणे आवश्यक आहे असे मत व्यक्त केले.
यावेळी नागेश भोसले, रामचंद्र गावकर, सुनील पाटील, नारायण गावडा, अथर्ब देसाई, अच्युत देसाई, गजानन देसाई यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.