कारवार : मतदानाचा दिवस जसजसा जवळ येऊ लागला आहे, तसतसा प्रचाराचा जोर वाढत आहे. काँग्रेसच्या उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर यांच्या प्रचारार्थ आज शनिवारी (ता.४) कारवार येथे भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली. यावेळी उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर यांच्यासह आमदार सतिश सैल यांनी दुचाकी चालवून लक्ष वेधून घेतले. हजारो कार्यकर्त्यांनी रॅलीत सहभाग घेतल्यामुळे कारवार शहर आज काँग्रेसमय झाले होते.
शहरातील मित्र समाज मैदानावरून रोड शोला सुरूवात झाली. कोडीबाग रस्त्यावरून टोल नाका ते सुंकेरी रस्त्यावरून पुन्हा मित्र समाज मैदानावर रॅलीची सांगता झाली. रॅलीत शहरातील हजारो युवकांनी दुचाकीवरून सहबाग घेतला होता. डॉ. अंजली निंबाळकर यांनी स्वत: दुचाकी चालवित जनतेला अभिवादन केले. जोरदार घोषणाबाजीमुळे आवघे शहर दणाणून गेले होते. शहरातील बहुतेक भागातून डॉ. निंबाळकर यांना पाठिंबा व्यक्त करण्यात येत होता.
अंकोल्यातही रोड-शो..
दरम्यान अंकोल्यात देखील आज रोड शोद्वारे काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी आमदार सतिश सैल यांच्यासह उत्तर कन्नडच्या उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर आणि दक्षिण कन्नडचे उमेदवार पद्मराज पुजारी यांनी जनतेला अभिवादन केले. प्रसंगी ठिकठिकाणी त्यांचे जंगी स्वागत करून त्यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात येत होता. एकंदर, कारवार आणि अंकोल्यातील रोडशोला मिळालेल्या प्रतिसादामुळे विरोधक भाजपच्या उमेदवारांचे धाबे दणाणले आहेत.