खानापूर : बेकवाड (ता. खानापूर) येथील पतीने पत्नीच्या डोक्यात लोखंडी रॉडने जोरदार प्रहार करून खून केल्याची घटना वास्को-गोवा येथे शुक्रवारी दुपारी घडली. वैशाली चाळोबा केसरेकर (वय 39) असे महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती चाळोबा गुणाजी केसरेकर (वय 45) याला पोलिसांनी घटनास्थळावरून अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, चाळोबा हा पत्नी व मुलासह वास्कोतील शांतीनगर येथे राहतो. त्याच्या सासऱ्याने त्यांना राहण्यासाठी आपल्या दुमजली इमारतीतील एक खोली दिली होती. चाळोबा व वैशाली यांच्यामध्ये गेल्या तीन वर्षापासून सतत भांडणे होत होती. वेळप्रसंगी चाळोबा हा पत्नी व मुलाला मारहाण करीत होता. त्याने नीट वागावे यासाठी सासऱ्याने अनेक प्रयत्न केले. परंतु, त्याच्या वागणुकीमध्ये फरक पडला नाही. त्यामुळे वैशाली आपल्या वडिलांकडे राहण्यास आली होती. त्यानंतर चाळोबा याच्या दोन बहिणींनी व दोन पंचांनी त्यांच्यामध्ये समेट घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यानंतर वैशाली दोन दिवसांपूर्वी चाळोबाच्या खोलीवर परतली होती.
शुक्रवारी (दि. २४) सकाळी चाळोबा व वैशाली मार्केटात गेले होते. त्यांनी भाजी व इतर वस्तू खरेदी केल्यावर घरी पतरले. दुपारी त्यांच्यामध्ये पुन्हा काही कारणाने वाद झाल्याने त्यांच्या खोलीतून भांडणाचा आवाज येऊ लागल्याचे शेजाऱ्यांनी त्याच्या सासऱ्याला सांगितले. या दरम्यान चाळोबा याने वैशाली हिच्या डोक्यावर लोखंडी रॉडने प्रहार केला. त्यामुळे ती गंभीर जखमी झाली. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने ती जागीच ठार झाली. त्यानंतर चाळोबा हा लोखंडी रॉड घेऊन जिन्याच्या पायरीवरच बसला होता. शेजाऱ्यांनी माहिती दिल्यावर त्याचे सासरे जिन्यावरून वर येऊ लागले होते. त्यावेळी चाळोबाने ‘वर आलात, तर मी तुम्हाला ठार मारणार, अशी धमकी देऊन त्यांना वर येण्यास अटकाव केला.
मात्र, त्याच्या धमकीला न भीता सासरे वैशालीच्या खोलीकडे गेले. तेव्हा वैशाली रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडल्याचे दिसले. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी चाळोबा याला अटक केली. या प्रकरणी वास्को पोलीस पुढील तपास करीत आहेत. दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.