युवा समितीतर्फे हलशी परिसरात शैक्षणिक साहित्याचे वितरण
खानापूर : सीमा भागात मराठी शाळा टिकविण्यासाठी पालकांनी जबाबदारी घेणे गरजेचे असून मराठी शाळा टिकल्या तरच मराठी भाषा आणि संस्कृतीचे रक्षण होणार आहे. त्यामुळे प्रत्येक गावातील नागरिकांनी आपल्या शाळेत विद्यार्थी कशा प्रकारे वाढतील याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई यांनी केले आहे.
महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे गुरुवारी हलशीवाडी व हलशी येथील सरकारी मराठी शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. प्रारंभी युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर, तालुका समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई, खानापूर समितीचे कार्याध्यक्ष निरंजन सरदेसाई, सरचिटणीस आबासाहेब दळवी, युवा समितीचे सरचिटणीस श्रीकांत कदम, कार्याध्यक्ष सचिन केळवेकर शाळा सुधारणा कमिटीचे अध्यक्ष विनोद देसाई यांच्या हस्ते सरस्वती फोटो पूजन करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक के. एस. जाधव यांनी स्वागत केले.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी गेल्या आठ वर्षांपासून युवा समितीतर्फे सीमा भागातील विविध मराठी शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शैक्षणिक साहित्याचे वितरण केले जात आहे. तसेच युवा समितीच्या उपक्रमाला अनेकांचे मोठे सहकार्य मिळत आहे. त्यामुळे शाळांमध्ये साहित्य वितरण करण्यात मदत होत असून अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. मात्र विद्यार्थ्यांची संख्या अधिक प्रमाणात वाढविण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे गरजेचे असून पुढील काळात मराठी शाळांचा विकासासाठी अधिक व्यापकपणे कार्यक्रम हाती घेतले जातील अशी माहिती दिली. निरंजन सरदेसाई, आबासाहेब दळवी आदींनी मनोगत व्यक्त केले. मिलिंद देसाई यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. सह शिक्षक व्ही आर बंडी यांनी आभार मानले. माजी तालुका पंचायत सदस्य चंद्रकांत देसाई, सिद्धार्थ चौगुले, आशुतोष कोचेरी, सुधिर देसाई, राजू देसाई, बंडू देसाई, विनायक देसाई, पुंडलिक देसाई, नरसिंग देसाई यांच्यासह आदि उपस्थित होते.
हलशी येथील मराठी शाळेत शैक्षणिक साहित्य वितरण करण्यात आले प्रारंभी मुख्याध्यापक व्ही एस माळवी यांनी शाळेबाबत अधिक माहिती दिली. त्यानंतर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. यावेळी शाळा सुधारणा कमिटीचे अध्यक्ष नरसिंग घाडी, रणजित पाटील, प्रल्हाद कदम, सह शिक्षिका एस जे हजारे, बी पी शिंदोळकर, जी एन घाडी, के पी पाटील, आदि उपस्थित होते.