Thursday , September 19 2024
Breaking News

सार्वजनिक आस्थापनांवर मराठी भाषेत नामफलक लावा अन्यथा तीव्र आंदोलन

Spread the love

 

खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचा इशारा

खानापूर : राज्य सरकारने शासकीय तथा निमशासकीय इमारतींवर त्रिसूत्रीय धोरणानुसार मराठीत नामफलक लावणे बंधनकारक आहे. कर्नाटक शासनाने देखील व्यावसायिक आस्थापनावर ६० टक्के कन्नड तर ४० टक्के स्थानिक भाषेत नामफलक लावण्याचे निर्देश दिले आहेत असे असताना खानापूर शहरात नव्याने होत असलेल्या हायटेक बस स्थानक तसेच सरकारी माता आणि शिशु नूतन इमारतीवर केवळ कन्नड भाषेत नामफलक लावण्यात आले आहेत. त्यामुळे तालुक्यातील मराठी भाषिकात असंतोष पसरला आहे. खानापूर तालुक्यात मराठी भाषिकांचे प्राबल्य अधिक आहे त्यामुळे दैनंदिन व्यवहारासाठी नामफलकांवर मराठी भाषेचा उल्लेख असणे गरजेचे आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीने यापूर्वी देखील संबंधित अधिकाऱ्यांना व तालुक्यातील लोकप्रतिनिधींना निवेदने देऊन मराठीतून फलक लावण्याची मागणी केली होती. सदर दोन्ही इमारती उद्घाटनासाठी सज्ज झाले आहे तरी देखील अद्याप या इमारतींवर मराठी भाषेतून फलक लावण्यात आले नाहीत. राज्य सरकारने ६० टक्के कन्नड भाषा व ४० टक्के स्थानिक भाषेला प्राधान्य असा नियम केलेला असताना राज्य सरकारला सरकारी इमारतींवर फलक लावताना स्वतः केलेल्या नियमांचा विसर पडल्याचे दिसून येत आहे. खानापूर तालुक्यात मराठी भाषिकांची संख्या जास्त प्रमाणात आहे. सर्वसामान्य जनतेची भाषेची अडचण ओळखून प्रशासनाने सर्व शासकीय निमशासकीय इमारतींवर कन्नडसह मराठी भाषेत फलक लावावे. येत्या १२ तारखेला हायटेक बस स्थानकाचे उद्घाटन आहे. तत्पूर्वी सर्व शासकीय फलकांवर मराठी भाषेचा उल्लेख करण्यात यावा अन्यथा १२ तारखेला उद्घाटन समारंभासाठी येणाऱ्या मंत्रिमहोदयांसमोर निदर्शने करण्यात येथील, असा धमकी वजा इशारा तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने आमदार विठ्ठल हलगेकर, तहसीलदार प्रकाश गायकवाड यांना निवेदनाद्वारे दिला.
खानापूर शासकीय विश्रामगृहात आमदार विठ्ठल हलगेकर यांना समिती पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले आणि सरकारी नियमानुसार शासकीय इमारतींवर कन्नड सोबत मराठी भाषेत फलक लावणे अत्यंत गरजेचे असून यासाठी आपण प्रयत्न करावेत व मराठी भाषिकांची समस्या दूर करावी, अशी मागणी केली. यावेळी आमदार विठ्ठलराव हलगेकर यांना आपण मराठी भाषिक आहात. खानापूर तालुक्यात कन्नड बरोबर मराठीमध्ये नामफलक लावण्यासाठी सरकार दरबारी विशेष प्रयत्न करावेत अशी मागणी देखील यावेळी खानापूर समितीने केली. निवेदनाचा स्वीकार करून आपण सरकार दरबारी मराठीमध्ये नामफलक लावण्यासंदर्भात विशेष प्रयत्न करू अशी ग्वाही आमदार विठ्ठल हलगेकर यांनी समिती पदाधिकाऱ्यांना दिली.
खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक शिवस्मारक येथे पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी समिती अध्यक्ष गोपाळराव देसाई होते. यावेळी खानापूर तालुक्यात समिती अधिक बळकट करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच १२ तारीखेला होणाऱ्या शासकीय कार्यालयांच्या उद्घाटनासंदर्भात चर्चा करून या कार्यक्रमाला सकारात्मक सहकार्य करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला. त्याचप्रमाणे मराठी भाषेत नामफलक लावण्यासंदर्भात निवेदन देण्याचा ठराव करण्यात आला.
दरम्यान नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत कारवार लोकसभा मतदारसंघातून समितीचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढविलेले उमेदवार निरंजन उदयसिंह सरदेसाई यांनी लोकसभेच्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्याध्यक्षपदाचा राजीनामा समिती पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला. परंतु महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी कार्याध्यक्ष निरंजन सरदेसाई यांनी दिलेल्या राजीनाम्याचा स्पष्ट शब्दात नकार दर्शवत त्यांनी समितीच्या कार्यात यापुढे देखील कार्यरत रहावे व संघटना बळकट करावी अशी विनंती त्यांना करण्यात आली.
या बैठकीला कार्याध्यक्ष निरंजन सरदेसाई, सरचिटणीस आबासाहेब दळवी, गोपाळराव पाटील, पांडुरंग सावंत, शिवाजी पाटील, रणजीत पाटील, शंकरराव पाटील, संजय पाटील, पुंडलिक पाटील, रामचंद्र गावकर, ऍड. केशव कळ्ळेकर यांच्यासह समिती कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

मणतुर्गे येथील श्री रवळनाथ मंदिराचा लिंटल भरणी कार्यक्रम संपन्न

Spread the love  खानापूर : मणतुर्गे तालुका खानापूर येथील श्री रवळनाथ मंदिराच्या जिर्णोद्धार करण्यासाठी १४/०९/२०२४ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *