Tuesday , September 17 2024
Breaking News

शोकांतिका! एका महिलेला उपचारासाठी चक्क तिरडीवरून आणले!

Spread the love

 

खानापूर : एकीकडे देश तंत्रज्ञानात विकसित होत चंद्रावर पोचला असला तरी गावे मूलभूत सुविधांपासून अद्याप वंचित आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळून 77 वर्षे लोटली तरी देखील ग्रामीण भागातील अनेक गावे शासनाच्या सोयीसुविधांपासून वंचित आहेत. याचा प्रत्यय नुकताच खानापूर तालुक्यातील आमगाव गावात आला असून गावातील एका महिलेला उपचारासाठी चक्क तिरडीवरून 4 किलोमीटर घेऊन जावे लागले. ही खानापूर तालुक्याची शोकांतिकाच म्हणावी लागेल.
खानापूर तालुका हा निसर्गाने नटलेला तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्याचा पश्चिम भाग हा अरण्य संपत्तीने व्यापलेला आहे. या दुर्गमभागातील वस्त्या वाड्यांची परिस्थिती अतिशय वाईट आहे. या भागातील अनेक गावे शासनाच्या सोयीसुविधांपासून वंचित आहेत. पावसाळ्यात तर या गावाचा संपर्क पूर्णपणे तुटतो. या गावातील शिक्षक देखील आठवड्यातून किंवा पंधरा दिवसातून एकदाच शाळेत येतात. याच गावातील हर्षदा घाडी नामक महिला अचानक चक्कर येऊन पडली. गावातील नागरिकांनी प्रथमोपचार करण्याचा प्रयत्न केला परंतु त्या महिलेला श्वास घेण्यास अडथळा आल्यामुळे तिला उपचारासाठी खानापूरला नेण्यासाठी प्रयत्न सुरु झाले. रुग्णवाहिका आमगावात येण्यासाठी रस्त्याची सोय नसल्यामुळे नदीपलिकडे रुग्णाला घेऊन जाण्यासाठी गावकऱ्यांना चक्क तिरडीचा वापर करावा लागला. गावकऱ्यांनी हर्षदा घाडी या महिलेला तिरडीवरून गावातील नागरिकांनी नदीपालिकडे घेऊन आले त्यानंतर त्या महिलेला रुग्णवाहिकेतून खानापूर येथे आणण्यात आले परंतु तिची प्रकृती गंभीर असल्यामुळे तिला जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. खानापूर तालुक्यातील दुर्गम भागातील अनेक गावे आजही रस्ते, वीज, वैद्यकीय सुविधांपासून वंचित आहेत याकडे सरकार लक्ष देईल का?असा प्रश्न या भागातील नागरिक करीत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

लोकोळी येथील लक्ष्मी मंदिरात चोरी!

Spread the loveखानापूर : खानापूर तालुक्यातील लोकोळी येथील लक्ष्मी मंदिरात काल रात्री चोरी झाली असून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *