खानापूर : प्रति वर्षाप्रमाणे मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन तसेच इतर इयत्तेतील गरजू विद्यार्थ्यांना महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वितरण केले जाते त्यानुसार खानापूर तालुक्यातील दुर्गम भागातील विविध गावातील शाळांमध्ये एकत्र शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. खानापूरमधील शिरोली केंद्रावर हा वितरणाचा संयुक्त कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून खानापूर महाराष्ट्र कीकरण समितीचे सरचिटणीस आबासाहेब दळवी व युवा समिती अध्यक्ष श्री. अंकुश केसरकर उपस्थित होते.
खानापूर तालुक्यातील अबनाळी, डोंगरगाव, गवाळी, हेम्मडगा, जामगाव, नरसे, पाली, शिरोली, तिवोली, चापवाडा, हणबरवाडा, कोंगळे, मेंडील, पास्तोली, सायाचीमाल, शिरोलिवाडा, तेरेगाळी आदी गावातील शाळांमधील शिक्षक उपस्थित होते त्यांच्याकडे सदर साहित्य सुपूर्द करण्यात आले.
युवा समिती अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी दुर्गम भागात सेवा बजावत मराठी शाळांची काळजी घेणाऱ्या शिक्षकांचे यावेळी कौतुक केले तसेच मराठी भाषा वाचवायची असेल तर मराठी शाळा टिकल्या पाहिजेत आणि त्यासाठी सर्वांनी एकत्र प्रयत्न केले पाहिजे असे विचार व्यक्त केले, श्री आबासाहेब दळवी यांनी युवा समितीच्या उपक्रमाला सदिच्छा देत मातृभाषेतून शिक्षण काळाची गरज असून पालकांनी माजी विद्यार्थी आणि गावकऱ्यांनी यासाठी जनजागृती करत पुढे आले पाहिजे असे सांगितले. यावेळी युवा समिती कार्याध्यक्ष सचिन केळवेकर, आकाश भेकणे यांच्यासह सर्व शाळांमधील मुख्याध्यापक, सहशिक्षक उपस्थित होते.