खानापूर : खानापूर तालुक्यातील एका टोकास वसलेल्या दुर्गम भागातील आमगाव येथील महिलेला उपचारासाठी तिरडीवरून चार किलोमीटर आणावे लागले होते. गेल्या शुक्रवारी दुपारी आमगांव येथील महिला हर्षदा हरिश्चंद्र घाडी (वय 38) हिला दुपारी अचानक छातीत दुखून चक्कर येऊ लागली. त्यामुळे गावातील नागरिकांनी तिला प्राथमिक उपचार करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर हर्षदा घाडी यांना तिरडीवरून गावातील 20 ते 25 ग्रामस्थांनी, आळीपाळीने तिचे ओझे वाहत नदीच्या काठापर्यंत आणले. रुग्णवाहिका नदीच्या पलीकडे येऊन उभी राहिली होती. यानंतर रुग्णवाहिकेतून या महिलेला खानापूर इस्पितळात दाखल करण्यात आले. परंतु तिची प्रकृती अतिशय गंभीर असल्याने तिला बेळगाव जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. बेळगावच्या जिल्हा रुग्णालयातून पुढे तिला केएलई रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान उपचार सुरू असतानाच काल रात्री उशिरा तिचा मृत्यू झाला.
दरम्यान काल धो धो कोसळत असलेल्या पावसात हर्षदा यांचा मृतदेह बैल नदीपर्यंत रूग्णालयाच्या वाहनातून आणण्यात आला. त्यापुढे पुन्हा लाकडी तिरडी वरुन धो धो कोसळत असलेल्या पावसात मृतदेह नदी पार करत चिखल, खाच खळग्यांनी भरलेल्या रस्त्यातून पुढे गावापर्यंत नेण्यात आला. त्यानंतर भर पावसातच मृतदेहावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.