Monday , December 8 2025
Breaking News

जिल्हा पालकमंत्र्यांनी केली खानापूर तालुक्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी

Spread the love

 

मंत्री सतीश जारकीहोळी यांनी जनतेच्या तक्रारी स्वीकारून समस्या सोडविण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या

बेळगाव : जिल्ह्यातील संभाव्य अतिवृष्टी/पुराच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम आणि जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी शुक्रवारी (26 जुलै) खानापूर तालुक्यातील पूरग्रस्त व पावसाने नुकसान झालेल्या भागांना भेट दिली.
जांबोटी रोडवरील कुसमळी पूल, त्यानंतर खानापूर ते जांबोटीला जोडणाऱ्या मध्यभागी मलप्रभा नदीवर बांधण्यात आलेल्या पुलाच्या स्थितीची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी विविध गावांतील लोकांचे गाऱ्हाणे ऐकून घेतले.

दरवर्षी पावसाळ्यात हिरेहट्टीहोळीला पूर येत असल्याने वैद्यकीय सुविधा, शिक्षण व इतर पायाभूत सुविधा ग्रामस्थांना उपलब्ध नाहीत; त्यामुळे यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी ग्रामस्थांनी मंत्र्यांकडे केली. याची माहिती घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

१५ गावांतील लोक स्थलांतर करण्यास तयार

यावेळी पत्रकारांशी बोलताना मंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले की, खानापूर तालुक्यातील १५ गावांची यादी करण्यात आली असून त्यांना मुलभूत सुविधा देण्यात याव्यात. अन्यथा तेथील लोकांना स्थलांतरित करण्याचा विचार करण्यात येत आहे.

नवीन रस्ता तयार करण्यासाठी वनविभागाची परवानगी नाही. अशा परिसरात शेकडो वर्षांपासून लोक राहतात. बंगळुरूमध्ये वनमंत्री आणि स्थानिक आमदारांसोबत यापूर्वीच बैठक झाली आहे. स्थानिक परिस्थिती वनमंत्र्यांना समजावून सांगणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नुकताच अतिदुर्गम भागातील आमगाव गावातील एका महिलेचा आरोग्याच्या समस्येमुळे मृत्यू झाल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांकडून मिळाली. तिथे नेटवर्कची समस्या आहे, रुग्णवाहिका योग्य वेळी रुग्णालयात पोहोचण्यासाठी योग्य रस्ता नाही, अशी माहिती आहे.

अशातच अतिदुर्गम भागातील ग्रामस्थांना रेशन मिळण्यासाठी धडपड सुरू आहे. मंत्री सतीश जारकीहोळी यांनी स्पष्ट केले की, 80 टक्के लोक सहमत असतील तर त्यांना इतरत्र हलवता येईल.

खानापूरच्या अनेक जुन्या पुलांवर खबरदारीचा उपाय म्हणून अवजड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याची दुरुस्ती आणि खानापूर ते गोवा राज्याच्या सीमेपर्यंत पूल बांधण्यासाठीही निविदा मागवण्यात आल्या आहेत. पावसाळा संपल्यानंतर नवीन पूल बांधण्याची सूचना केली जाईल, असे ते म्हणाले.

जिल्ह्यातील पूर एवढ्या धोकादायक पातळीवर नाही. सध्याची पूरस्थिती नियंत्रणात आहे. सध्या कोणतीही अडचण नाही.

यावेळी खानापूरच्या आमदार विठ्ठल हलगेकर, माजी आमदार अंजली निंबाळकर, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.भीमा शंकर गुळेद यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

तालुका समितीच्या वतीने नंदगड भागात महामेळाव्यासंदर्भात जनजागृती!

Spread the love  खानापूर : 2004 साली सीमाप्रश्नाचा खटला महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *