खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर येथील ताराराणी हायस्कूलमध्ये बालक-पालक व शिक्षकांची जागर सभा संपन्न झाली.
यावेळी बोलताना प्रमुख वक्ते प्रा. अरविंद पाटील यांनी पालकत्वाची व्याप्ती आणि जबाबदारी समजावून देताना अनेक संदर्भ जोडून पालकत्व किती छान असते? याबद्दल आपल्या शैलीत समजावून देण्याचा प्रयत्न केला. कालचा पालक आणि संगणक, मोबाईल आणि इंटरनेट जमान्यातील पालक यातील फरक समजावून सांगताना ते म्हणाले, पालक हा माळी काम करणारा बागकाम करणार कामगार असतो. माळी जसं तण काढतो, नको असलेली फांदी छाटतो, रोपट्यांना खत पाणी घालतो आणि झाड वाढण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करतो तशाच पद्धतीने पालकांनी आपल्या पाल्यांना अभ्यासाला पोषक वातावरण निर्माण करून दिलं पाहिजे मग ती पालकत्वाची बाग फुलांनी बहरून आणि फळांनी लगडून जाईल जर आपण हे योग्य वेळी केलं नाहीतर पालकत्वाची बाग फलदायी ठरणार नाही त्यासाठी आपण सजग आणि सज्ज राहायला हवे. असे सांगितले.
या कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवन व स्वागत गीताने झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ताराराणी हायस्कूलचे मुख्याध्यापक राहुल एन. जाधव होते. बाबा व आई पालकांचे प्रतिनिधित्व करणारे यशवंत घाडी व श्रीमती कविता देसाई याही
व्यासपीठावर उपस्थित होत्या. या पालक जागर सभेचे प्रास्ताविक पी. एल. तरळे यांनी केले तर वर्गशिक्षिका श्रीमती एम. एस. तंगडे यांनी इयत्ता दहावीच्या परीक्षेमध्ये उत्तम गुण घेण्यासाठी विद्यार्थीनींनी कोणकोणत्या गोष्टींचे नियोजन करायला हवे? याबाबत सखोल माहिती दिली. आई पालक श्रीमती कविता देसाई व बाबा पालक श्री. यशवंत घाडी यांनी आपले विचार मांडले. पालक प्रल्हाद पाटील यांनी मौलिक सूचना मांडून या वर्षी शाळेत प्रथम येणाऱ्या विद्यार्थीनीला रोख रक्कमेचे बक्षीस स्वयंस्फूर्तीने जाहीर केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानावरून विचार मांडताना मुख्याध्यापक राहुल एन. जाधव यांनी पालकांनी उपस्थित केलेल्या समस्या निवारण करीत विद्यार्थीनींंच्या उत्तम निकालासाठी नियोजन केलेल्या योजनांचा व विद्यार्थीनीमध्ये गुणात्मक बदल घडविण्यासाठी उचललेल्या पावलांचा सविस्तर आढावा घेत पालकांच्या व विद्यार्थीनींंच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त करीत शिक्षकांच्या वतीने आपण योजनांची ठोस अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले व खानापूर तालुक्यात असलेली आपल्या शाळेची उज्ज्वल परंपरा अबाधित ठेवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शाळेच्या क्रीडा शिक्षिका श्रीमती गीतांजली मंडोळकर यांनी केले तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एल. आर. पाटील यांनी केले. या जागर सभेला इयत्ता दहावीच्या विद्यार्थीनींची शंभर टक्के उपस्थिती होती. शिवाय पालकांचीही उपस्थिती मोठ्या प्रमाणात लाभली होती.
