Friday , September 20 2024
Breaking News

धर्मांतरण आरोप; बागलकोटमधील शाळा बंद करण्याचा आदेश, माघार

Spread the love

शिक्षणाधिकाऱ्यांचा तुघलकी कारभार

बंगळूर : बागलकोट जिल्ह्यातील हुंगुंडजवळील इल्कल येथील सेंट पॉल उच्च प्राथमिक शाळा बंद करण्याचा आदेश जारी करण्यात आला. ‘विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करत असल्याच्या आरोपावरून शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. परंतु अद्याप कायदा जारी झाला नसल्याची जाणीव होताच त्यांनी आदेश मागे घेतला. परंतु त्यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ माजली आहे.

हुंगुंडच्या गट शिक्षणाधिकाऱ्यांनी (बीईओ) २६ डिसेंबर रोजी काही उजव्या संघटनांच्या तक्रारीनंतर आणि एका अधिकाऱ्याने केलेल्या तपासणीनंतर हा आदेश जारी केला.
परंतु, कर्नाटक सरकारने बळजबरीने किंवा फसवणुकीद्वारे धर्मांतराविरोधात अद्याप कायदा केलेला नाही. कर्नाटक प्रोटेक्शन ऑफ राईट टू रिलिजन बिल, २०२१, बेळगाव येथील हिवाळी अधिवेशनात विधानसभेने मंजूर केले, परंतु सरकारने हे विधेयक विधान परिषदेत मांडले नाही. हे विधेयक धर्मांतर विरोधी विधेयक म्हणून ओळखले जाते.
बागलकोट जिल्ह्यात ३१ डिसेंबर रोजी शाळा बंद झाल्याची बातमी प्रसारमाध्यमांद्वारे प्रसिद्ध झाल्यानंतर अधिकार्‍यांनी आदेश मागे घेतला. २६ डिसेंबर रोजी शाळेला सुट्टी असल्याने हा आदेश जारी करण्यात आल्याने चार दिवस शाळा प्रभावीपणे बंद राहिल्या.
बागलकोटचे सार्वजनिक शिक्षण उपसंचालक श्रीशैल बिरादार यांनी बीईओने आदेश मागे घेतल्याची पुष्टी केली. शाळा ३१ डिसेंबरला पुन्हा सुरू झाली, असे ते म्हणाले.
त्यांच्या आदेशात, गट शिक्षणाधिकाऱ्यांनी म्हटले होते की, नियमांचे उल्लंघन करून ख्रिसमस साजरा केल्याबद्दल शाळा अनिश्चित काळासाठी बंद करण्यात येत आहे. मात्र, त्यांनी आदेशात नियमांचा उल्लेख केलेला नाही. २५ डिसेंबर रोजी ख्रिसमसच्या उत्सवात तुम्ही वर्गात मांस दिले होते. त्यामुळे जनतेला आणि विभागासमोर पेच निर्माण झाला आहे. तुम्हाला पुढील आदेशापर्यंत शाळा बंद ठेवावी लागेल. परवानगीशिवाय शाळा पुन्हा सुरू केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असे त्यांनी प्रतिपादन केले होते.
तत्पूर्वी, ‘हिंदुत्ववादी संघटना’चे निमंत्रक प्रदीप अमरन्नावर यांनी तहसीलदार के. रथना यांच्याकडे तक्रार करून शाळा विद्यार्थी आणि पालकांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला होता. शालेय व्यवस्थापनाने ख्रिसमसच्या दिवशी विद्यार्थी आणि पालकांना शाळेत आमंत्रित केले आणि त्यांना मांस, वाइन आणि ‘सत्यवेद’, बायबलचे कन्नड भाषांतर, सह जेवण दिले. हे दुसरे तिसरे काही नाही, तर मोह आणि बळजबरीने हिंदूंना ख्रिश्चन बनवण्याचा प्रयत्न आहे, असा दावा त्यांनी केला.
मुख्याध्यापिका सिल्व्हिया डी मार्क आणि शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य जॅक्सन डी मार्क आणि उमेश नायक हरपनहळ्ळी यांची तक्रारीत नावे आहेत. “शाळा सुरू झाल्यापासून, या व्यक्ती बंजारा, अंबीगर आणि इतर गटांसारख्या गरीब आणि मागासलेल्या समाजातील सदस्यांचे धर्मांतर करत आहेत. ते हिंदू देवतांचा अपमान करत आहेत आणि असुरक्षित गटांचे धर्मांतर करत आहेत. एकदा त्यांचे धर्मांतर झाले की, ते धर्मांतरित व्यक्तींना पुतळे व त्यांच्या घरातील हिंदू देवदेवतांच्या प्रतिमा फेकून देण्यास भाग पाडतात. हे कायद्याच्या विरोधात आहे. इतकेच काय तर शाळा व्यवस्थापन शिक्षण विभागातील काही अधिकाऱ्यांना लाच देत असल्याने शाळेच्या परवान्याचे दरवर्षी नूतनीकरण होत आहे. अधिकाऱ्यांनी शाळा बंद करून परवाना रद्द करावा, असे तक्रारीत म्हटले आहे.
तक्रार आल्यानंतर शिक्षण विभागाचे ब्लॉक रिसोर्स सेंटरचे समन्वयक आय. एम. अंगडी यांनी शाळेची पाहणी करून अहवाल सादर केला. बीईओनी या अहवालावर कारवाई करत शाळा बंद करण्याचे आदेश जारी केले.
जॅक्सन डी मार्क यांनी २९ डिसेंबर रोजी इल्कल येथे पत्रकारांना सांगितले की, हे आरोप निराधार आहेत. आम्ही कोणाचेही धर्मांतर करत नाही. सर्व प्रथम, शाळा ख्रिश्चन मिशनऱ्यांद्वारे चालवली जात नाही. ती इल्कलमधील काही रहिवासी चालवतात. शाळा समितीमध्ये सर्व धर्माचे सदस्य आहेत. शाळेत सर्व धर्माचे विद्यार्थी असतात. दुपारचे जेवण शाळेत घेण्यात आले नाही. शाळा भाड्याच्या जागेत चालविली जाते, असे त्यांनी सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

खानापूर वार्ता आयोजित व जिजाऊ गणेश उत्सव मंडळ पुरस्कृत 2024 घरगुती मखर सजावट स्पर्धेचा बक्षिस समारंभ संपन्न

Spread the love  खानापूर : खानापूर वार्ता आयोजित व जिजाऊ गणेश उत्सव मंडळ पुरस्कृत 2024 …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *