खानापूर : ग्रामीण भागातील वीज पुरवठा खंडित होणार नाही यासाठी व्यापक उपाययोजना कराव्यात तसेच हलशी येथील सब स्टेशन लवकर कार्यान्वित करावे अशी मागणी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने हेस्कॉमकडे करण्यात आली आहे.
खानापूर तालुका समितीच्या पदाधिकाऱ्यानी गुरुवारी खानापूरचे नूतन सहाय्यक कार्यकारी अभियंता जगदीश मोहिते यांची भेट घेतली. यावेळी अध्यक्ष गोपाळ देसाई यांनी पावसाला सुरुवात झाल्यानंतर वीज पुरवठा थंडीत होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अनेक गावातील नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पावसाला सुरुवात झाल्यानंतर वीज पुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना वीज पुरवठा खंडित झाल्यास अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे जंगल भागातील वीज पुरवठा खंडित होऊ नये यासाठी योग्य प्रकारे आराखडा तयार करून वीज वाहिन्या घालाव्यात.
तालुक्याच्या कोणत्याही भागातील वीज पुरवठा अधिक दिवस बंद राहणार नाही यासाठी हेस्कॉमने प्रयत्न करावेत. तसेच वारा आणि पावसामुळे ट्रान्सफॉर्मर आणि वीज तारांचे नुकसान होणार नाही. याकडे लक्ष देत पावसाला सुरुवात होण्यापूर्वी काळजी घ्यावी अशी मागणी केली.
सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी खानापूर तालुक्यातील नागरीक नेहमीच हेस्कॉमला सहकार्य करीत आले आहेत. तरीही हेस्कॉमने कारणे न देता नागरिकांच्या समस्या सोडवण्यास प्राधान्य द्यावे. खानापूर तालुक्यातील अनेक गावे दुर्गम भागातील आहेत त्यामुळे अडचणी येतात याची जाणीव असली तरी सातत्याने वीज पुरवठा खंडित होणार नाही याकडे लक्ष देणे गरजेचे आहे असे सांगितले.
निरंजन सरदेसाई यांनी खानापूर तालुक्यात अनेक जण उद्योगधंदे सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र वीज पुरवठ्याची समस्या असल्यामुळे उद्योग सुरू करण्यासाठी अडचण येत आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात उद्योग धंदे सुरू करण्यासाठी आवश्यक असलेला विजेचा पुरवठा करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी केली.
सहाय्यक कार्यकारी अभियंता जगदीश मोहिते यांनी काही दिवसांपूर्वीच पदभार स्वीकारला आहे. त्यामुळे या भागातील समस्यांची माहिती घेत आहे येणाऱ्या काळात समस्या दूर व्हाव्यात यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची चर्चा करून त्याचे निवारण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कर्मचाऱ्यांची कमतरता असल्यामुळे काही प्रमाणात अडचणी येत आहेत मात्र हेस्कॉमच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी खानापूर तालुक्याला भेट देऊन येथील परिस्थितीची माहिती घेतली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात या भागातील समस्या करण्यासाठी दुर होतील. खानापूर तालुक्यात कर्मचाऱ्यांची कमतरता आहे त्यामुळे कर्मचारी अधिक प्रमाणात द्यावेत अशी मागणी करण्यात येइल असे आश्वासन मोहिते यांनी दिले आहे. यावेळी मुकुंद पाटील, राजाराम देसाई आदि उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta