खानापूर : नंजिनकोडल-दोड्डेबैल संपर्क रस्ता खचल्याने या मार्गावरील रहदारी ठप्प झाली आहे. पंधरा दिवसांपूर्वी शेतवडीतील मोरीच्या पुलाला भगदाड पडले होते. ग्राम पंचायतीने मुरुम टाकून तात्पुरती दुरुस्ती केली होती. पण, मंगळवारी (दि. १३) आज बाजूपट्ट्यांसह रस्ताच खचल्याने दोन्ही गावांचा एकमेकांशी असलेला संपर्क तुटला आहे.
डांबरीकरणानंतर अवघ्या दोनच महिन्यात दोन ठिकाणी भगदाड पडले. पाच फूट खोल खड्डा पडून रस्ताच खचला आहे. त्यामुळे, पंचायत राज विकास खात्याच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नंजिनकोडल ग्राम पंचायतीच्या अखत्यारीतील या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. शिवारातील पाणी खाली जाण्यासाठी या रस्त्यावर पाईप टाकून मोरी बांधण्यात आली आहे. पहिल्याच पावसाच्या तडाख्याने या मोरीवरील रस्ता खचला आहे. रस्ता खचलेल्या ठिकाणी दरीसारखी परिस्थिती निर्माण झाल्याने सर्व प्रकारची रहदारी ठप्प झाली आहे. दोड्डेबैल ग्रामस्थांना ग्राम पंचायत कार्यालयासह इतर कामांसाठी रोज नंजिनकोडलला जावे लागते. अनेक शेतकऱ्यांची या बाजूला शेती आहे. रस्ता खचून सायकल जाण्याएवढीही जागा शिल्लक नसल्याने ऐन गणेशोत्सवात मोठे विघ्न निर्माण झाले आहे.