खानापूर : अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय सचिवपदी खानापूरच्या माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नुकताच झालेल्या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी बेळगाव जिल्ह्यातून जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी काँग्रेसचे सचिव म्हणून काम पाहिले आहे. या नियुक्तीबद्दल माजी आमदार अंजली निंबाळकर यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीची बैठक दिल्ली येथे काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात ३० ऑगस्ट रोजी पार पडली. या बैठकीत काँग्रेस पक्षाच्या सचिव आणि सहसचिवांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यात माजी आमदार अंजली निंबाळकर यांची काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय सचिवपदी निवड करण्यात आली आहे. आणि त्यांना गोवा, दादर, नगरहवेली, दीव, दमण या राज्यांच्या पदभाराची जबाबदारी देण्यात आली आहे. ही निवड काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी, सेक्रेटरी के. सी. वेणुगोपाल आणि सूरजेवाल यांनी केली आहे. माजी आमदार अंजली निंबाळकर यांचा आजपर्यंत काँग्रेस पक्षातील योगदानाचा विचार करून त्यांची राष्ट्रीय सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी निंबाळकर यांनी केरळ, तामिळनाडू, तेलंगणा विधानसभेच्या निवडणुकीत निरीक्षक म्हणून काम पाहिले आहे. लोकसभा निवडणुकीच्या सत्यशोधन समितीच्या सदस्य म्हणूनही काम पहात आहेत.